US Federal Bank Rate: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. मात्र, वर्षअखेर एकदा दरवाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. सध्यातरी दरवाढीला लगाम लावला आहे. व्याजदर 5.25 ते 5.5 टक्के असून त्यात वाढ केली नाही. फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर (FOMC) चेअरमन जेरोम पॉवेल यांनी माहिती दिली. दरम्यान, अमेरिकेतील सध्याचे व्याजदर हे 22 वर्षांच्या उच्चांकावर आहेत.
पुढील वर्षीही व्याजदर चढेच राहणार
महागाई, बेरोजगारी आणि इंधनाचे दर पाहता सध्यातरी व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता कमी आहे. वर्षअखेर पुन्हा एकदा किंचित दरवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षीही व्याजदर चढेच राहतील असेही सुतोवाच फेडरल बँकेने दिले.
सध्या जागतिक बाजारात इंधनाचे दर अचानक वाढलेले आहेत. त्यामुळे फेड व्याजदर वाढ करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, व्याजदरवाढीला बँकेने ब्रेक लावला. वर्षअखेर व्याजदर 5.50 ते 5.75% टक्क्यांपर्यत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
बेरोजगारीचा दर वाढण्याची शक्यता
2024 मध्ये व्याजदर खाली येतील, असा अंदाज बँकेने आधी लावला होता. मात्र, पुढील वर्षीही दर चढेच राहतील, असे बँकेने म्हटले आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर सध्या 3.8% आहे. पुढील काही महिन्यात हा दर 4 टक्क्यांच्यापुढे जाऊ शकतो. 1980 नंतर सर्वात जास्त महागाई अमेरिकेत आहे.
फेडरल बँकेने मागील वर्षी मार्च 2022 पासून व्याजदर 525 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. युरोपियन सेंट्रल बँकेनेही सलग 10 वेळा दरवाढ केली असून सध्या व्याजदर 4% आहे. हा व्याजदर 1999 नंतरचा सर्वात जास्त आहे. युरोप आणि अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थिती असून शिखर बँकांनी महागाई रोखण्यासाठी दरवाढीचा सपाटा मागील वर्षापासून लावला आहे. मात्र, अमेरिकेने तूर्तास दरवाढीला लगाम लावला आहे.