Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Transactions: ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड ब्रेक UPI पेमेंट्स; 1 हजार कोटींचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला

UPI Payments

Image Source : www.businesstoday.in

भारतात सध्या डिजिटल पेमेंट्सची चलती आहे. किराणा दुकानातून अंडी, ब्रेड घेण्यापासून ते मोठे व्यावसायिक पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात UPI पेमेंट्सच्या व्यवहारांनी नवा उच्चांक गाठला. एक महिन्यात किती कोटी व्यवहार झाले वाचा.

UPI Transactions data: UPI आधारित डिजिटल पेमेंट्सने ऑगस्ट महिन्यात नवा उच्चांक गाठला. एका महिन्यात लहान-मोठे मिळून एकूण 1 हजार कोटी UPI व्यवहार भारतीयांनी केले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) याबाबत माहिती दिली. डिजिटल पेमेंट्सची देशातील संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवनवीन पेमेंट्स अ‍ॅप्स लाँच होत आहेत.

NPCI ने X (पूर्वीचे ट्विटर) माध्यमावर याबाबत पोस्ट केली आहे. "UPI ने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडत 10 बिलियन पेक्षा जास्त व्यवहार ऑगस्ट महिन्यात पूर्ण केले. युपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट्समध्ये अशीच वाढ होत राहो, असे NPCI ने ट्विटमध्ये म्हटले आहे. NPCI ही सरकारी कंपनी असून डिजिटल पेमेंट्सचे व्यवस्थापन पाहते. 

जुलै महिन्यात 9.96 बिलियन UPI व्यवहार झाले होते. या व्यवहारांचे एकूण मूल्य 15.34 लाख कोटी इतके होते. दुकानातील किरकोळ अंडी, ब्रेड, बिस्किटपासून ते मोठे व्यवसायातील पेमेंट्ससुद्धा UPI द्वारे होऊ लागले आहेत. लहान दुकाने तसेच भाजी मंडईतील हातगाड्यांवरही UPI चे स्कॅनर सर्रास दिसतात. ऑगस्ट महिन्यातील व्यवहारांची संख्या आणखी वाढली.  

UPI व्यवहारांत अठराशे टक्क्यांनी वाढ

2018 ते 2022 या कालावधीत UPI व्यवहारात 1,876 टक्के वाढ झाली. मुल्याचा विचार करता 1320% वाढ झाली. 2018 साली फक्त 374.63 कोटी व्यवहार झाले होते. (UPI transactions in India)  2022 साली त्यात वाढ होऊन 7,403.97 कोटी छोटे-मोठे व्यवहार झाले. तर 2018 साली 5.86 लाखांचे व्यवहार झाले होते. त्यात वाढ होऊन 2022 साली 83.2 लाखांचे व्यवहार झाले. 

परदेशी पर्यटकांनाही UPI पेमेंटची मुभा

परदेशी आणि NRI नागरिकांना UPI द्वारे पेमेंट करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दिली. त्यामुळे आता पर्यटक आणि भारतात इतर कामांसाठी आलेले नागरिकही UPI पेमेंट करू शकतात. तसेच G20 देशातील नागरिकांनाही बंगळुरू, दिल्ली आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर UPI पेमेंटची सुविधा दिली आहे. 

इतर देशांसोबत मिळून UPI पेमेंट सुविधाही भारताने सुरू केली आहे. बांगलादेश, नेपाळ या शेजारील देशांसह सिंगापूर, फ्रान्ससोबतही NPCI ने हातमिळवणी केली आहे.