Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI-PayNow : भारत-सिंगापूरमध्ये UPI पेमेंटला सुरुवात; मायदेशात पैसे पाठवण्यासाठी सर्वसामान्यांना होणार फायदा

UPI-PayNow launched

Image Source : www.en.wikipedia.org.com www.abs.org.sg.com

भारत आणि सिंगापूरमध्ये आता UPI आधारित डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. अॅपद्वारे चुटकीसरशी नागरिकांना पैसे ट्रान्सफर करता येतील. परदेशातून आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवण्याचा सोपा आणि सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. कोणत्या बँकांद्वारे ही सुविधा दिली जाते, पैसे पाठवण्याची मर्यादा किती, याबद्दलची सविस्तर माहिती वाचा.

India Singapore remittance Transfer: भारतीय ऑनलाइन पेमेंट सिस्टिम UPI (Unified payment Interface) जगभरात प्रसिद्ध असून त्याच्या वापराने डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. भारतातील अनेक नागरिक सिंगापूरमध्ये नोकरी, व्यवसायासाठी जातात. त्यांना मायदेशी कुटुंबियांना पैसे पाठवणे आता अधिक सोपे झाले आहे. भारत आणि सिंगापूरने मिळून क्रॉस बॉर्डर UPI पेमेंटला सुरुवात केली आहे. मोबाइल अॅपद्वारे दोन्ही देशांत पैसे ट्रान्सफर करता येतील. 

भारतीय UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि सिंगापूरची ऑनलाइन पेमेंट प्रणाली PayNow ने आज यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी पैसे पाठवणे सुकर झाले आहे. तसेच भारतात वास्तव्यास असलेल्या सिंगापूरच्या नागरिकांनाही या सेवेचा फायदा होईल.

डिजिटल पेमेंटमुळे ‘रेमिटन्स’ जलद मिळणार (India Singapore remittance process through UPI)

जेव्हा एखादा परदेशात राहणारा व्यक्ती त्याच्या कुटुंबियांना स्वगृही पैसे पाठवतो, त्यास रेमिटन्स मनी असे म्हणतात. हे पैसे पाठवण्याचे व्यवहार बँकिंग व्यवस्थेद्वारे होतात. जुन्या पद्धतीनुसार एका देशातून दुसऱ्या देशात पैसे ट्रान्सफर करण्यास जास्त अवधी लागतो, तसेच यासाठी मोठे शुल्कही आकारले जाते. मात्र, आता UPI द्वारे पेमेंट जलद आणि कमी खर्चात होणार आहे. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल. 

रेमिटन्सच्या रुपाने भारतामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये येतात. ही प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

UPI आणि Paynow अॅप द्वारे दोन्ही देशांतील नागरिक पैसे ट्रान्सफर करू शकतील. डिजिटल पेमेंटच्या सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या नागरिकांचे अभिनंदन केले. (UPI-PayNow launched) "आजचा दिवस दोन्ही देशांसाठी खूप आनंदाचा असून, या करारामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असे करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले. 

कोणत्या बँकांद्वारे व्यवहार होतील (Banks which offer UPI remittances transfer to Singapore)

आरबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, इंडियन बँक आणि आयसीआयसीआय बँकेद्वारे रेमिटन्स सेंड आणि रिसिव्ह करता येईल. तर अॅक्सिस आणि DBS बँकेद्वारे फक्त रेमिटन्स रिसिव्ह करण्याची सुविधा असेल. सिंगापूरच्या ग्राहकांना DBS-Singapore आणि Liquid या आर्थिक संस्थांद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच येत्या काळात आणखी बँकांचा समावेश या नेटवर्कमध्ये केला जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

एका दिवसात किती पैसे पाठवू शकतो? (Limit to send money Singapore in one day)

वर दिलेल्या बँकामधील खातेधारक भारतामधून दरदिवशी 60 हजार रुपये सिंगापूरमध्ये पाठवू शकतो. सिंगापूर डॉलरमध्ये (SGD) ही रक्कम 1000 SGD इतकी होते. इंटरनेट बँकिंग किंवा अॅपद्वारे हे पेमेंट करता येईल. सध्या फक्त वैयक्तिक व्यवहारांसाठी या सुविधेचा वापर करता येणार आहे.

सिंगापूरमध्ये किती भारतीय राहतात? (How many people live in Singapore)

भारतीय नागरिक जगभरामध्ये विखुरले आहेत. प्रत्येक देशांमध्ये इंडियन डायस्पोरा कम्युनिटी तयार झाली आहे. सिंगापूरमध्ये सुमारे 7 लाख भारतीय राहतात. सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येच्या ही संख्या 9% आहे. सिंगापूर हा छोटा देश असून त्याची लोकसंख्या सुमारे 54 लाख आहे.