जगभरात कामानिमित्त, पर्यटनासाठी किंवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. गेल्याच आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीनंतर फ्रान्सने UPI पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्ससोबत इतर 13 देशांनी देखील असाच निर्णय घेतला असल्याची माहिती इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड (NIPL) चे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश शुक्ला यांनी दिली आहे.
येत्या काही दिवसांत UPI द्वारे अनेक आखाती देश आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये व्यवहार करता येणार असल्याचे देखील शुक्ला यांनी म्हटले आहे. आखाती आणि अमेरिकन देशांशी याबाबत चर्चा सुरु असून, त्यावर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. याबाबत नेमका निर्णय कधी होईल याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. सध्या इतर देशांशी चर्चा सुरु असून त्यावर मार्ग निघेल असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीयांची होणार सोय
माध्यमांशी बोलताना रितेश शुक्ला म्हणाले की ज्या देशांमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात अशा देशांशी सध्या NIPL ची बोलणी सुरु आहे. आखाती देश आणि अमेरिकन देशांमध्ये भारतीय प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थिती या देशांमध्ये UPI सुविधा उपलब्ध करून दिल्यास सर्वाधिक फायदा हा भारतीयांनाच होणार असल्याचे ते म्हणाले.
13 देशांशी सामंजस्य करार
रितेश शुक्ला म्हणाले की, यूपीआय सेवा परदेशात वाढवण्यासाठी आम्ही विविध देशांसोबत बोलणी करत आहोत. NIPL अनेक देशांमध्ये UPI साठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी, अनेक देशांमध्ये इंटरऑपरेट प्रणाली विकसित केली जात असून सिंगापूरने फेब्रुवारी 2023 रोजी क्रॉस बॉर्डर UPI लाँच केले असल्याचे ते म्हणाले. फ्रान्स आणि सिंगापूर येथे आता भारतीयांना UPI पेमेंटचा अमार्ग वापरता येणार आहे.
केंद्र सरकारने G20 शिखर परिषदेत परदेशी प्रवासी आणि अनिवासी भारतीयांसाठी UPI ची सुविधा सुरू केली होती. यासोबतच मलेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, जपान, दक्षिण कोरियासह 13 देशांनी भारत सरकारसोबत या विषयावर सामंजस्य करार केला आहे. या देशांमध्ये आता UPI पेमेंट वापरता येणार आहे.