Maharashtra Unseasonal Rain: जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने राज्यातील किमान पाच जिल्ह्यांमध्ये कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. पण अजूनही त्यावर कम सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.
तोंडाशी आलेला घास हिरावला…..
काढणीला आलेले पीक म्हणजेच तोंडाशी आलेला घास. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण अजूनही त्यावर काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात मंगळवारी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई केली जाईल, असेही ते म्हणाले होते.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि काही जिल्ह्यांत गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या भागातील शेतीच्या नुकसानीची माहिती मागवून घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरीत भरपाई मिळू शकेल..
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितले की, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून राज्य सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान
राज्यात गेल्या 2 दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला तयार असलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना न्याय द्यावा..
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानमुळे शेतकऱ्याचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न उभा झाला आहे. शेतकऱ्यांचे कुटुंब हे शेतातील मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते. आता जर शासनाने भरपाई दिली नाही तर शेतकरी उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. पिकाला भाव नाही, त्यात आता हे आस्मानी संकट याचा सामना आम्ही करावा तरी कसा? शेतकऱ्यांच्या समस्या समजून शासनाने योग्य तो न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.