कोरोना संकटातून सावरत विकास पथावर वेगाने दौडणाऱ्या अर्थव्यवस्थेबाबत आर्थिक पाहणी अहवालात सकारात्मक अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये जीडीपी 6 ते 6.8% इतका राहील. पुढील आर्थिक वर्षात जीडीपी 7% इतका वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टाऊन हॉलमध्ये खासदारांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी सरकारने गेल्या आठ वर्षात केलेल्या कामांचे कौतुक केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या बजेटकडे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आज स्त्री शक्तीचा सन्मान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सामान्य भारतीयांच्या अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन पूर्ण करतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत असल्याने अर्थव्यवस्था वेगाने उभारी घेईल असा विश्वास इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. नॉमिनल जीडीपी 11% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भांडवली खर्चात झालेली प्रचंड वाढ, लघु उद्योजकांना अर्थ सहाय्य, कॉर्पोरेटची दमदार कामगिरी आणि वस्तूंचा वाढता खप तसेच स्थलांतरित कामगार पुन्हा शहरांकडे परतल्याने अर्थचक्राला वेग आल्याचे अहवालात म्हटले आहे. क्रयशक्तीच्या आधारे भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. तर चलन विनिमय दराचा विचार करेला तर भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था असल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
आर्थिक पाहणी अहवालात रुपयाच्या अवमूल्यनाबाबत चिंता करण्यात आली आहे. वित्तीय तूट वाढल्यास रुपयावरील दबाव वाढेल असे अहवालात म्हटले आहे. मात्र परकीय चलन साठा वाढेल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे. चालू खात्यातील तूट भरुन काढण्यासाठी पुरेसा परकीय चलन साठा असल्याचा दावा आर्थिक पाहणीमध्ये करण्यात आला आहे.