यावेळी सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात (Budget 2023-24) डिजिटल इंडियावर भर दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या घोषणेमध्ये शिक्षक प्रशिक्षण, मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार करण्याची घोषणा केली आहे. या डिजिटल लायब्ररीशी (Digital Library) सर्व शाळा-महाविद्यालयेही जोडली जाणार आहेत. नॅशनल डिजिटल लायब्ररी ही पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. या डिजिटल लायब्ररीमध्ये प्रादेशिक तसेच इंग्रजी भाषेतील पुस्तके मिळतील. सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनुसार पुस्तके उपलब्ध असतील. याचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सरकारच्या घोषणेनंतर हे वाचनालय चर्चेत राहिले आहे. डिजिटल लायब्ररी म्हणजे काय? आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल? ते जाणून घेऊया.
डिजिटल लायब्ररी म्हणजे काय?
डिजिटल लायब्ररी म्हणजे ऑनलाइन किंवा ई-लायब्ररी ज्यामध्ये पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्या असतात. यात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ देखील समाविष्ट आहे. तुम्ही कुठूनही डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकता. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा लाभ मिळणार आहे. डिजिटल लायब्ररीच्या पायाभूत सुविधांमध्ये हाय स्पीड लोकल नेटवर्क, रिलेशनल डेटाबेस, विविध प्रकारचे सर्व्हर आणि डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम समाविष्ट आहेत.
डिजिटल लायब्ररी कशी चालेल?
कोणत्याही इंटरनेट एनेबल्ड डिव्हाइसमधून डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश करता येतो. लायब्ररीमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुमच्याकडे लॅपटॉप किंवा टॅब असणे आवश्यक नाही. त्याऐवजी, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाइल फोनवरून ते अॅक्सेस करू शकाल. डेटाबेसच्या बाबतीत ते कोणत्याही फिजिकल लायब्ररीपेक्षा मोठे असेल. त्याची स्टोरेज स्पेस जवळजवळ अनलिमिटेड असेल, ज्यामुळे जगभरातील पुस्तकांपर्यंत मुलांना पोहचता येणार आहे. याशिवाय, डिजिटल लायब्ररीमध्ये 24*7 एक्सेस करता येतो. लायब्ररीमध्ये कुठूनही आणि केव्हाही प्रवेश करता येतो आणि त्याचा डेटा वाढतच राहील. डिजिटल लायब्ररीचा एक फायदा म्हणजे अनेक विद्यार्थी एकाच वेळी एक पुस्तक एक्सेस करू शकतील.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मदत मिळेल
अर्थमंत्र्यांच्या घोषणेमध्ये सांगण्यात आले की, नॅशनल डिजिटल लायब्ररी ही पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. मर्यादित पुस्तके उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पुस्तके उपलब्ध होतील. डिजिटल लायब्ररीमध्ये अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबतच मुलांच्या वयानुसार इतर उपयुक्त पुस्तकेही उपलब्ध असतील.