केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटमध्ये महिलांसाठी विशेष गुंतवणूक योजनेची घोषणा केली. महिलांसाठी एकवेळ गुंतवणूक करता येणारी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (Mahila Samman Saving Certificate) ही योजना अर्थमंत्री सितारामन यांनी जाहीर केली. मार्च 2025 पर्यंत महिलांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही दोन वर्ष मुदतीची गुंतवणूक योजना असून यात महिला जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत महिलांना 7.5% व्याज मिळणार आहे. या योजनेत महिला स्वताच्या नावे किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक करता येणार आहे.
याशिवाय बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील गुंतवणूक मर्यादा दुपटीने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (Senior Citizen Saving Scheme - SCSS) आता ज्येष्ठ नागरिकांना 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. यापूर्वी 15 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा होती.
पोस्टाच्या मंथली इन्कम स्किममधील गुंतवणूक मर्यादा आता 9 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4.5 लाख रुपये होती. जॉइंट अकाउंटसाठी ही मर्यादा 9 लाख रुपयांवरुन 15 लाख करण्यात आली आहे.