Union Bank Q4 Results: युनियन बँक ऑफ इंडियाने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेच्या निव्वळ नफ्यात 93.27% वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी 2,782 कोटी रुपये नफा कमावला. वैयक्तिक, व्यवसाय आणि शेती अशा तिन्ही श्रेणीतील कर्ज वितरण व्यवसाय वाढल्याचे तिमाही निकालातून दिसत आहे.
भागधारकांना लाभांश जाहीर
मागील वर्षीच्या (FY22) चौथ्या तिमाहीत कंपनीला 1,440 कोटी रुपये नफा मिळाला होता. त्या तुलनेत आता नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत झाल्यानंतर कर्ज वितरणाची चांगली आकडेवारी बँकेने नोंदवली. सोबतच बँकेने समभागधारकांना प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला.
व्याजाद्वारे युनियन बँकेने तिमाहीत 8,251 कोटी रुपये नफा कमावला. व्याजातून मिळणाऱ्या नफ्याची वाढ 21.88% ठरली. चालू आणि बचत खात्यातील ठेवी मागील वर्षीच्या तुलनेत 4.47% वाढल्या. 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण ठेवी 11,17,716 कोटी आहेत. बँकेच्या एकूण मालमत्तेतही वाढ झाली. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 358 बेसिस पाँइटने कमी होऊन 7.53% झाले आहे.
अनुत्पादित कर्ज कमी झाले
31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार बँकेचा एकूण व्यवसाय 19,27,621 कोटींचा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा व्यवसाय 10.23% वाढला आहे. तर ठेवींचे प्रमाण 8.26% वाढले आहे. मार्च 2024 पर्यंत एकूण व्यवसायात 10 ते 12% वाढ होण्याचा अंदाजही वर्तवला आहे. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 6% च्या खाली आणण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. सोमवारी शेअर बाजारात या निकालाचे पडसाद उमटू शकतात.
क्षेत्रनिहाय व्यवसाय वृद्धी
रिटेल म्हणजेच वैयक्तिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात 17.19% वार्षिक वाढ झाली आहे. तर शेती संबंधित क्षेत्रामधील व्यवसायात 14.20% आणि उद्योग व्यवसायांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्यवसायात 13.06% इतकी वाढ बँकेने नोंदवली आहे.