Recruitment drive: फिजिक्सवाला, देशातील सर्वात स्वस्त शिक्षण-तंत्रज्ञान (EduTech) प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत प्रत्येक व्हर्टीकलमध्ये 2 हजार 500 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. एकीकडे सर्वच कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, फिजिक्सवालाचा स्पर्धक बायजु'ससुद्धा कर्मचारी कपात करत आहे. तिथे नव नियुक्तीची योजना फिजिक्सवाला आखत आहे.
फिजिक्सवाला (Physics Wallah) ही नियुक्ती ब्रँड टिकून राहण्यासाठी, त्याच्या भविष्यासाठी करत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे त्यांचे ध्येय आहे, त्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे. दर्जेदार शिक्षण हेच फिजिक्सवालाची ओळख आहे.
फिजिक्सवाला फॅकल्टी सदस्यांसाठी तसेच व्यवसाय विश्लेषक, डेटा विश्लेषक, सल्लागार, ऑपरेशन्स मॅनेजर, बॅच मॅनेजर, शिक्षक अशा बऱ्याच पदांसाठी ओपनिंग केले जाणार आहे. तसेच काही तांत्रिक विभागातही पदनियुक्ती होणार आहे. अर्थात, ही एडटेक युनिकॉर्न कंपनी मेगा रिक्रूटमेंट ड्राइव्ह उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. अडीच हजार जागांची भरती, देशपातळीवर केली जाणार आहे.
फिजिक्सवालाचे एचआर प्रमुख सतीश खेंगरे म्हणाले की, पीडब्ल्यू म्हणजे फिजिक्सवाला हे एक वाढणारे कुटुंब आहे आणि अधिक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी हे गरजेचे आहे. विद्यार्थी आमच्या संस्थेवर विश्वास ठेवतात हे पाहून आम्हाला आनंद होतो, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात कुठेही कमी राहू नये याचा प्रयत्न आहे. तसेच आता व्यवसाय वाढीच्या हा टप्पा आहे, त्यामुळे आम्ही विविध व्यावसायीक तज्ज्ञांची भरती करत आहोत. आमचे उद्दीष्ट समजून त्यातून कंपनीसह सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी अग्रेसर असतील अशा व्यक्तींच्या शोधात कंपनी आहे. म्हणजेच, सर्वांसाठी परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या आणि विद्यार्थ्यांसाठी आजीवन शिक्षण भागीदार बनण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असतील.
एनडीए, यूपीएससी, एसएससी, सीडीएस, रेल्वे, बँकिंग, सीए, कॉमर्स, बीए आणि इतर, जेईई आणि एनईईटी व्यतिरिक्त इतर परिक्षांसाठी फिजिक्सवाला बॅच सुरू करत आहे. फिजिक्सवाला करिअर बिल्डिंग आणि तांत्रिक कौशल्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीडब्ल्यू कौशल्ये देखील सुरू करत आहे. कंपनीने अपस्किलिंग श्रेणीमध्ये आपल्या ऑफरिंगचा विस्तार करण्यासाठी आय न्यूरॉन कंपनी देखील विकत घेतली. आय न्यूरॉन (iNeuron) एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा विज्ञानावर केंद्रित एडटेक प्लॅटफॉर्म आहे. कंपनीने हा करार 250 कोटी रुपयांना केला आहे. फिजिक्सवालामध्ये सध्या 6 हजार 500 हून अधिक कर्मचारी आहेत, ज्यात 2 हजारांहून अधिक शिक्षक आणि शैक्षणिक तज्ञांचा समावेश आहे. एडटेक उद्योगात सध्याच्या टाळेबंदीच्या लाटेत नोकऱ्या कमी न करणाऱ्या संस्थांपैकी ही एक आहे. उलट कंपनीच्या प्रणालीमध्ये नवीन व्यावसायिकांना समाविष्ट करून कंपनीच्या वाढीचा मार्ग पुढे नेणार आहे आणि हेच नवे कर्मचारीही करतील अशी आशा खेंगरे यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा 101 वा युनिकॉर्न बनला (Became the country's 101st unicorn)
जून 2022 मध्ये, फिजिक्सवाला 100 दशलक्ष युएस डॉलर, म्हणजे सुमारे 777 कोटी रुपये निधी उभारून देशातील 101 वा युनिकॉर्न बनले. फिजिक्सवाला यांनी ही गुंतवणूक वेस्टब्रिज आणि जीएसव्ही व्हेंचर्सकडून राऊंड-ए फंडिंग राऊंडमध्ये $1.1 बिलियनच्या मुल्यांकनाने उभारली. राउंड-ए फंडिंग राउंडमध्ये ही कामगिरी करणारी ही पहिली एडटेक कंपनी आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचे अॅप्लिकेशन आतापर्यंत 7 दशलक्ष लोकांनी डाउनलोड केले आहे आणि यूट्यूबवर 12 दशलक्ष लोक त्याच्याशी जोडलेले आहेत.