Unemployment rate rises to 8% in November : बेरोजगारी हा भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नेहमीच एक महत्वाचा प्रश्न राहीला आहे. यातच आता सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची म्हणजेच सीएमआयईची बेरोजगरीविषयीची आकडेवारी समोर आली आहे. यात नोव्हेंबरमध्ये बेरोजगारी दर 8 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.बेरोजगारी ही देशातील महत्वाच्या आर्थिक समस्येपैकी एक आहे. कोरोना कालावधीत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ज्यामुळे हा प्रश्न अधिक तीव्र झाला होता.
Table of contents [Show]
तीन महिन्यातील उच्चांक (Highest Rate In Last Three Month's)
सीएमआयईकडून गुरुवारी याविषयी आकडेवारी जाहीर करण्यात आली. यातून नोव्हेंबरमधील बेरोजगारी दराने 3 महिन्यातील उच्चांक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात तो 7.7 टक्के इतका होता.
अशी आहे महाराष्ट्रातील बेरोजगारीची स्थिती (Unemployment Status in Maharashtra)
नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारी दर 3.5 टक्के इतका राहीला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी चांगली असल्याचे सीएमआयईच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. याधीच्या 2 महिन्यात तो चार टक्के व त्यापुढे होता. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हा दर आणखी कमी आहे. शहरी भागात तो 4.8 टक्के तर ग्रामीण भागात 2.8 टक्के इतका आहे.
शहरांमध्ये बेरोजगारी अधिक (Unemployment Rate Higher In Urban areas)
सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार शहरी भागात बेरोजगारी अधिक असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर 8.04 टक्के तर ग्रामीण भागात 7.21 टक्के इतका होता. नोव्हेंबरमध्ये यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरमध्ये शहरी भागात हा दर 8.96 टक्के तर ग्रामीण भागात 7.55 टक्के इतका आहे.
हरियाणामध्ये सर्वाधिक तर छत्तीसगडमध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर
सीएमआयई च्या आकडेवारीनुसार हरियाणामध्ये सर्वाधिक तर छत्तीसगडमध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणामध्ये 30.6 टक्के तर छत्तीसगडमध्ये 0.1 टक्का इतका बेरोजगारी दर आहे. हरियाणाव्यतिरिक्त राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार आणि त्रिपुरा ही सर्वात खराब कामगिरी करणारी राज्ये ठरली आहेत. या राज्यांमधील बेरोजगारी दर अनुक्रमे 24.5 टक्के, 23.9 टक्के, 17.3 टक्के आणि 14.5 टक्के इतका आहे. बेरोजगारी दर कमी असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तराखंड 1.2 टक्के, ओडिशा 1.6 टक्के, कर्नाटक 1.8 टक्के, मेघालयमध्ये 2.1 टक्के इतका बेरोजगारी दर आहे.