Rishi Sunak Parliament Probe: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संसदीय समितीमार्फत चौकशी होणार आहे. पत्नी अक्षता मूर्तीचे आर्थिक हितसंबंध जपल्याचे आरोप सुनक यांच्यावर आहेत. विरोधी पक्षांनी हा आरोप केलाय. बोरिस जॉन्सन पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यानंतर लिझ ट्रुस यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा पंतप्रधान पद चर्चेत आले आहे. मागील वर्षभरापासून ब्रिटनमध्ये महागाई वाढली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याने मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
ब्रिटनमधील माध्यमांनी सर्वप्रथम याबाबत वृत्त दिले होते. त्यानंतर लिबरल डेमोक्रॅट या विरोधी पक्षाने मुद्दा उचलून धरला. आता ब्रिटनच्या संसदीय आयोगाकडून चौकशी होईल. संसदेच्या वेबसाईटवर सुनावणीसाठी हे प्रकरण सूचिबद्ध असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ते दोषी आढळल्यास ब्रिटनच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होऊ शकते. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास बाकी आहे.
काय आहे प्रकरण?
मार्च महिन्यात ऋषी सुनक यांनी ब्रिटनचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लहान मुलांची काळजी घेणाऱ्या चाइल्ड केअर संस्थांना आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या एका चाइल्ड केअर कंपनीच्या भागधारक आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पत्नीला फायदा व्हावा यासाठी हे धोरण आखलं गेलं, असा आरोप होत आहे. माध्यमांमध्ये ही बातमी सर्वप्रथम आली होती. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरले.
ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने आरोप फेटाळले
दरम्यान, पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. संसदीय चौकशीसाठी हे प्रकरण ठेवण्यात आले आहे. मात्र, चौकशी कमिशनपुढे आम्ही आमची बाजू मांडू. सरकारची धोरणे पारदर्शक आहेत. सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सरकारचे निर्णय घेण्यात येतात, असे सुनक यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
संसदीय कमिशनकडे हे प्रकरण तपासासाठी गेले आहे. सर्व सभागृहातील सदस्य नियम आणि कायद्यांचे पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी या कमिशनची आहे. या कमिशनपुढे सुनक आपली बाजू मांडतील. "declaration of interest" म्हणजेच कौटुंबिक हितसंबंधात आर्थिक फायदा होईल, असे धोरण आखल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर याचा निकाल पुढे येईल.
कोण आहेत ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती? (Who is Akshata Murthy)
अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. त्या एक फॅशन डिझायनर आणि व्हेंचर कॅपटलिस्ट आहेत. कर्नाटकातील हुबळी येथे अक्षता यांचा जन्म झाला असून बंगळुरुतील Baldwin Girls' High School येथे शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. स्टॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी घेतली असून फॅशन डिझाइनिंग संबंधित डिप्लोमाही केला आहे. 2009 साली त्यांचा ऋषी सुनक यांच्यासोबत विवाह झाला. दोघांची भेट स्टॅडफोर्ड विद्यापीठात झाली होती. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर अक्षता मूर्ती यांची संपत्ती चर्चेत आली होती. नुकतेच इन्फोसिस कंपनीचे शेअर्स ढासळल्याने अक्षता यांना सुमारे 500 कोटींचा तोटा झाला. त्या इन्फोसिस कंपनीच्या भागधारक आहेत.