Twitter Data Leak: ट्विटर कंपनी इलॉन मस्कने विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून ट्विटरला लागलेले ग्रहण काही संपायचे नाव घेईना. आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या डेटा लिकमध्ये 40 कोटी युझर्सचा डेटा हॅक करण्यात आला असून तो डार्क वेबसाईटवर (Dark Web) विकण्यासाठी ठेवण्यात आला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ज्याप्रमाणे ट्विटर कंपनी खरेदी करून त्यात अनेक बदल करून जगाला धक्के दिले आहेत. त्याचप्रमाणे हॅकर्सने हा मोठा धक्का मस्क आणि ट्विटरच्या युझर्सना दिला आहे.
हॅकर्सने हॅक केलेला डेटा हा खरा आहे; हे दाखवण्यासाठी हॅकर्सनी हॅकर फोरमवर या डेटामधील काही माहिती टाकली आहे. ज्यात ईमेल, संपूर्ण नाव, युझर नेम, फॉलोअर्सची संख्या आदी माहिती आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हॅक केलेल्या डेटामध्ये जगभरातील मोठमोठ्या व्यक्तीसह भारतातील काही प्रसिद्ध लोकांची नावे (High-Profile Accounts Hack) यात आहेत. जसे की, सलमान खान (Salman Khan Twitter Account Hack), नासा (NASA), स्पेसएक्स (SpaceX), सीबीएस मिडिया (CBS Media), सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai Twitter Account ), चार्ली पूथ, NBA, WHO, केंद्र सरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे खाते आदींचा समावेश आहे. या नावांव्यतिरिक्त आणखी बरीच हायप्रोफाईल नावे सुद्धा यात आहेत. बहुतांश नावे ही सोशल मिडियाच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्यांची आहेत. हा डेटा खरा असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या डेटा लिकच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून डेटा प्रोटेक्शन कमिशन (Data Protection Commission-DPC)ने 5.4 दशलक्षाहून अधिक यूझर्सच्या डेटाची तपासणी सुरु केली आहे.
इस्त्रायली सायबर क्राइम इंटेलिजेंस फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक आणि सीटीओ अॅलोन गल, यांच्या मते, बहुधा ही माहिती API मधील लूपहोलमधून गोळा केली गेली. ज्यामुळे धमकी देणाऱ्यांना कोणत्याही ट्विटर प्रोफाईलचा ईमेल किंवा फोन नंबर शोधणे शक्य झाले.
हॅकर्सने सॅम्पल डेटासोबतच एक पोस्ट देखील केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “ट्विटर किंवा इलॉन मस्क जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही आधीच 5.4 दशलक्ष युझर्सचा डेटा सुरक्षित न ठेवल्याबद्दल जीडीपीआर (General Data Protection Regulation-GDPR) तुमच्याकडून दंड आकारणार आहे. विचार करा जर 40 कोटी युझर्सचा डेटा रिलीज झाला तर तुम्हाला किती दंड बसेल. तुम्हाला जर फेसबुकप्रमाणे 533 मिलियन युझर्सचा डेटा सुरक्षित न ठेवल्याबद्दल 276 मिलिअन डॉलर्सचा दंड भरायचा नसेल तर हा सर्व डेटा खरेदी करा. तुम्ही जर असे केले तर सर्व डेटा व माहिती तुम्हाला दिली जाईल व ती पुन्हा विकली जाणार नाही,” असे लिहिले. हॅकरने या पोस्टमधून एकप्रकारे डील करण्याचा इशाराच दिला आहे.