सध्या देशभरात एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, कांदे, अद्रक आणि डाळी-कडधान्यांच्या वाढत्या किमती. रोजच्या आहारातील जिन्नस महाग झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. अशातच केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. परंतु एकानंतर एक अडचणी वाढतानाच दिसत आहेत. आधीच महागाईने हैराण असलेल्या सामान्यांना आता तूर डाळीच्या भाववाढीचा सामाना करावा लागतो आहे.
तूर डाळीचे भाव गगनाला भिडले…
गेल्या काही दिवसांपासून तूर डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डाळीची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारने कारवाईचा बडगा देखील उभारला होता. मात्र या कारवाईला म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाहीये.
ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 16 जुलैपर्यंत तूर डाळीच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात अरहर डाळ चांगलीच महाग झालीये. जून महिन्याचेच बोलायचे झाले तर या डाळीच्या किमतीत 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. महिन्याभरापूर्वी तूर डाळीचा भाव 127 रुपये प्रतिकिलो होता, तो 16 जुलै रोजी 136 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी तूर डाळीचा भाव 103 रूपये प्रतिकिलो नोंदवला गेला होता.
इतर डाळींचे भाव वाढले
ही भाववाढ फक्त तूर डाळीपुरती मर्यादित नसून उडद, मसूर आणि मूड डाळींच्या किमती देखील सरसरी 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळी आणि कडधान्ये महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. सध्या देशभरात पावसाचे वातावरण आहे. नाशवंत हिरव्या पालेभाज्यांची बाजारात आवक कमी होते आहे, परिणामी त्याचे भाव वाढले आहेत. अशा परिस्थिती सामान्य नागरिक डाळी आणि कडधान्ये खातात, मात्र आता त्यांचे देखील भाव वाढल्यामुळे सामन्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो आहे.
पेरणीखालील क्षेत्र कमी
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 9 जुलैपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.8 टक्के कमी क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली आहे. देशातील एकूण डाळींच्या उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे, परंतु यावर्षी या भागात पाऊस कमी पडला आहे. पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे येत्या काळातही उत्पादन कमी निघेल असा अंदाज आहे. असे झाल्यास यंदा डाळींची भाववाढ कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.