Air Ticket Prices Increased : नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 'गो फर्स्ट' कंपनीची लेह-श्रीनगर विमानसेवा सुरू होती. मात्र विमान सेवा बंद झाल्यामुळे आता नागपूरहून लेहला जाण्यापेक्षा दुबईला जाणे स्वस्त झाले आहे. ऐन उन्हाळाच्या सुट्ट्यांत पर्यटकांनी आधीच तिकीट बुक करुन ठेवले होते. मात्र, आता गो फर्स्टची विमान सेवा बंद पडल्याने पर्यटकांचा खोळंबा झाला आहे.
लेहला जाण्यासाठी नागपूर येथून थेट विमानसेवा नाही. त्यासाठी आधी दिल्लीला जावे लागते. तर दुबईला जाण्यास नागपूरमधून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. तुम्ही 31 हजार रुपयांमध्ये थेट दुबई गाठू शकता. परंतु, लेहला जाण्यासाठी 44 हजार रुपये खर्च येतो. दिल्ली ते लेह तिकिटाची किंमत 32 हजार रुपयांच्या जवळपास आहे.
बजेट 25 टक्क्यांनी वाढले
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे विमान तिकिटांच्या किंमती देखील झपाट्याने वाढतात. अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील तिकिटांचे दर दुप्पट झाले आहेत. तसेच, काही देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांचे तिकीट दर हे परदेशी तिकीट दरांपेक्षा महागले आहेत. या सर्व गोष्टींमुळे बऱ्याच पर्यटकांचे बजेट 25 टक्क्यांनी वाढले आहे. तर विमानाचे तिकिट बुकिंग करून देणाऱ्या कंपन्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
'गो फर्स्ट' विमान सेवेचे पैसे पचले
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात विमानसेवा देणाऱ्या कंपन्या आणि तिकिट बुकिंग करुन देणाऱ्या कंपन्या देखील आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या होत्या. आता कुठे पर्यटनाला चांगले दिवस यायला लागले होते, तर त्यात 'गो फर्स्ट' दिवाळखोरीत निघाली. पर्यटनाला जाण्यासाठी अनेकांनी काढलेल्या 'गो फर्स्ट' विमान सेवा तिकिटांचे पैसे सुध्दा अनेक परत मिळाले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागला.
आवडीचे ठिकाण
कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे पर्यटक तीन वर्षानंतर मनसोक्त फिरण्याचे नियोजन आखत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मिर, लेह, मनाली, शिमला यासारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये पर्यटन जोमाने बघायला मिळत आहे.
काय आहेत दर?
नागपूरहून श्रीनगरकडे जाणाऱ्या पर्यटकांना आता विमान तिकिटांसाठी 21 ते 25 हजार रुपये खर्च करावा लागत आहे. तर नागपूरहून जम्मूला जाण्यास 12 ते 14 हजार रुपयांचा खर्च येतो. नागपूर ते लेह जाण्यास 30 हजारांच्या जवळपास तिकीट आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री, यमूनोत्री, ऋषिकेश येथे फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नागपूर येथून विमानाने दिल्लीला जाण्यास प्रवाशांना 15 हजार रुपयांचा खर्च येतो आहे.