सध्या भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यापारवृद्धी होते आहे. दोन्ही देशांच्या आर्थिक व्यवहारातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था बळकट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक चलनात व्यापार मजबूत करण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात आता रुपयात व्यवहार होणार आहेत. याबाबतचा अधिकृत निर्णय दोन्ही सरकारांनी संयुक्तरीत्या जाहीर केला आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशने अमेरीकन डॉलर व्यतिरिक्त इतर चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश बँकेचे गव्हर्नर अब्दुर रौफ तालुकदार यांनी रूपयांमध्ये व्यवसाय व्यवहार सुरू करणे हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षात भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार वाढला आहे. एकमेकांचे शेजारी असलेले हे दोन्ही देश जर प्रादेशिक चलनात व्यवहार करत असतील तर ते दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरणार आहे असे ते म्हणाले. ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेशातून भारताला 2 अब्ज डॉलरची निर्यात होते, तर भारतातून बांगलादेशात 13.69 अब्ज डॉलरची आयात होते.
? India and Bangladesh has bilateral trade in Indian Rupee (INR).#business #trade #tradeagreement #freetrade #bangladeah #indiaandbangkadesh #upi #Rupee #rupeetrade pic.twitter.com/kMZjdsM3im
— daily postcards (@dailypostcards) July 12, 2023
टका-इंडिया ड्युअल करन्सी कार्ड
बांगलादेशचे राष्ट्रीय चलन ‘टका’ हे आहे. 1 टका म्हणजे 0.76 भारतीय रुपये होय. बांगलादेश आणि भारतीय व्यापारी यांच्यात व्यवहार सुरळीतपणे व्हावा यासाठी दोन्ही देशांच्या सहमतीने टका-इंडिया ड्युअल करन्सी कार्ड जारी केले जाणार आहे. यामुळे भारतातील व्यावसायिक व्यवहारांची किंमत कमी होणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये अमेरिकन डॉलर्सने व्यवहार होत होते. त्यामुळे दोन्ही देशांना आर्थिक ताण सहन करावा लागत होता. परकीय गंगाजळी जरी वाढत असली तरी सामान्य नागरिकांना मात्र महाग किमतीत सामानाची खरेदी विक्री करावी लागत होती. आता मात्र टका-इंडिया ड्युअल करन्सी कार्डमुळे दोन्ही देशांदरम्यान होणारी आयात आणि निर्यात देखील किफायतशीर ठरणार आहे. हे चलन कार्ड जवळपास तयार झाले असून ते सप्टेंबरमध्ये सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नॉस्ट्रो खाती सुरु करणार
आतापासून दोन्ही देशांमधला व्यापार सुरुवातीला रुपयात होईल आणि हळूहळू व्यापारातील तफावत कमी झाल्यामुळे बांगलादेशी चलन टका मध्ये व्यापार केला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बांगलादेश आणि भारतातील बँकांना परकीय चलन व्यवहाराच्या उद्देशाने नॉस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नॉस्ट्रो खाती म्हणजे दुसऱ्या देशातील बँकेत उघडलेली खाती, ज्याद्वारे दोन्ही देशांमधील व्यवहार केले जातात.
बाजारातील मागणी आणि प्रक्रियेत सहभागी असलेल्या बँकांनुसार व्यवहाराचा दर निश्चित केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.