चालू वर्षामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त कारनिर्मितीचा महत्वाकांक्षी संकल्प टोयोटा कंपनीने केला आहे. कच्च्या माल, सुटे भाग आणि कोरोनामुळे पुरवठा साखळीत अडथळा येण्याची शक्यता असतानाही 1 कोटी 60 लाख कारची निर्मिती होईल, असा विश्वास कंपनीला आहे. 10% गाड्यांचे उत्पादन कमी होण्याचा धोका कंपनीला येत्या काळात दिसत आहे.
चीप आणि सुट्या पार्ट्सचा तुटवडा
वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक चीप आणि सुट्या पार्ट्सचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर कारखान्यांमध्ये कामगारांचा तुटवडा भासत आहे. सर्वात जास्त इलेक्ट्रिक चीपचे उत्पादन चीनमध्ये होते. त्यामुळे येत्या काळात चीपचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक उपकरणे आणि वाहन निर्मिती क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो.
वर्षभरात किती गाड्यांची निर्मिती करायची याची आकडेवारी जाहीर केल्यामुळे पुरवठादारांनाही त्यानुसार नियोजन करता येते, असे टोयोटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षामध्ये टोयोटा कंपनीने 92 लाख गाड्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले होते. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि चीप तुटवड्यामुळे कार निर्मितीच्या या अंदाजातही भविष्यात बदल केला जाऊ शकतो.
हायड्रोजन कार निर्मितीसाठी टोयोटाचे प्रयत्न
टोयोटा कंपनीने नुकतेच करोला स्पोर्ट या गाडीला हाड्रोजन इंधनावर चालवण्याची चाचणी घेतली. त्यासाठी विशेष हायड्रोजन इंधनावर चालणारे कंम्बशन इंजिन तयार करण्यात आले होते. 2025 पर्यंत टोयोटा कंपनी 15 इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने साडेतेरा बिलियन डॉलर गुतंवणूक केली आहे. यामध्ये बॅटरी निर्मिती प्रकल्पाचाही समावेश आहे. मात्र, फक्त EV नाही तर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडी निर्मितीवरही कंपनी लक्ष देत आहे.
2040 पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या गाड्या निर्मिती न करण्याच्या करारावर मर्सडिज, जनरल मोटार, फोर्ड कंपन्यांनी सह्या केल्या आहेत. मात्र, टोयोटा आणि वोक्सवॅगन कंपन्यांनी या करारावर सह्या केल्या नाही. हायड्रोजन इंधनाचा इंटरनल कंम्बशन इंजिनमध्ये वापर करून गाडी चालवण्यासाठी टोयोटा प्रयत्नशील आहे.