दिवाळी आली की खरेदी सुरू होते. सणांच्या काळात कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण खरेदी करतो. अनेकजण दिवाळीच्या शुभ मुहर्तावर नवीन गाडी देखील खरेदी करतात. त्यामुळे या काळात गाड्यांच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. तुम्ही देखील नवीन गाडी घरी आणण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. या टिप्स फॉलो केल्यास गाडी खरेदी करताना तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुमचे बजेट ठरवा – नवीन कार खरेदी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा टप्पा तुमचे बजेट किती आहे, हे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ गाडीचीच किंमत नाही, तर सोबतच त्यावर लागणार कर, विमा, मेंटेन्स इत्यादी सर्व खर्चाचा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही गाडी कर्ज काढून घेणार असाल किती ईएमआय भरू शकता, याबाबत माहिती घ्या. बाजारात अगदी 7 लाख रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये येणाऱ्या अनेक चांगल्या फॅमिली कार आहेत.
कोणती कार घ्यायची ते ठरवा – तुम्ही गाडी कोणत्या उद्देशाने घेत आहात? कुटुंबात किती सदस्य आहेत? यावरून कोणती कार घ्यायची ते ठरवा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हॅचबॅक, एसयूव्ही, एमयूव्ही आणि सेडान कार खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक कारला देखील मोठी पसंती मिळत आहे. परंतु, इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी जवळील चार्जिंग स्टेशन, सर्व्हिस सेंटरबाबत जाणून घ्या.
कारबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या – कार खरेदी करण्यापूर्वी इंजिन, अॅक्सेसरीजबाबत संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. सीएनजी, पेट्रोल की डिझेल यापैकी कशावर धावणारी कार खरेदी करायची आहे? ऑटोमेटिक की मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणारी कार खरेदी करणार आहात? हे ठरवल्यास कारची निवड करणे सोपे जाईल. तुम्ही गाडी खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्ह देखील घेऊ शकता. तसेच विमा, वॉरंटी याबाबत देखील जाणून घ्या.
कर्ज – गाडी खरेदी करताना कर्जाचा देखील विचार करावा लागतो. झिरो डाउन पेमेंटवर गाडी खरेदी करता येते. परंतु, अशावेळी कर्जाची रक्कम खूपच जास्त असते. याशिवाय, तुम्हाला जरमहिन्याला जास्त रक्कमेचा कर्जाचा हफ्ता भरावा लागेल. तसेच, थेट कार डिलरच्या माध्यमातून गाडीसाठी कर्ज घेणे टाळावे. कार डिलर व बँकेमध्ये टाय-अप असल्याने तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः कर्जाची माहिती घ्यावी व जी बँक कमी व्याजदरात कर्ज देईल त्याची निवड करावी.
वेटिंग पीरियड आणि डिस्काउंट – दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण नवीन गाडी खरेदी करतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करण्यासाठी गेल्यास त्वरित कार मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही काही दिवस आधीच बुकिंग केल्यास दिवाळीच्या दिवशी कार घरी घेऊन येऊ शकता. कार खरेदी करण्यापूर्वी वेटिंग पीरियड देखील जाणून घ्यावा.
तसेच, दिवाळीच्या निमित्ताने अनेक कंपन्या आकर्षक ऑफरची घोषणा करतात. यामध्ये डिस्काउंट, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश असतो. या ऑफर्सचा फायदा मिळाल्यास कार स्वस्तात खरेदी करता येईल.