तुमच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास तुम्हाला खासगी वाहनचालकापासून ते कुरिअर सर्व्हिसपर्यंत अनेक नोकऱ्या सहज मिळू शकतात. विशेष म्हणजे या कामातून तुम्हाला महिन्याला 25 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स कोणती नोकरी मिळू शकते, याविषयी जाणून घेऊयात.
ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास मिळतील या नोकऱ्या
खासगी वाहनचालक | तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास खासगी वाहनचालक म्हणून कोणीही नोकरी देईल. अनेकांना खासगी वाहनचालकांची गरज असते. विशेष करून व्यावसायिक, सेलिब्रेटी वाहनचालकांना नोकरी देतात. खासगी वाहनचालक म्हणून काम करताना तुम्हाला अनेकदा आंतरराज्य प्रवास करावा लागू शकतो. या नोकरीसाठी 20 ते 25 हजार रुपये पगार मिळेल. |
टॅक्सी ड्रायव्हर | ओला, उबर सारख्या राइडशेअरिंग कंपन्या प्रचंड लोकप्रिया झाल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वाहनचालक दररोज हजारो रुपयांची कमाई करत आहे. चालक स्वतःच्या वाहनाची या प्लॅटफॉर्म्सवर नोंदणी करू शकतात. त्यानंतर प्रवाशी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाहनांचे बुकिंग करतात. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या वाहनाची या प्लॅटफॉर्म्सवर बुकिंग करून कमाई करू शकता. याशिवाय, बस ड्रायव्हर म्हणूनही काम करता येईल. अनेक शाळांना बस ड्रायव्हरची गरज असते. या कामातूनही तुम्हाला चांगला पगार मिळेल. |
ट्रक ड्रायव्हर | तुमच्याकडे जर अवजड वाहन चालविण्याचा परवाना असल्यास ट्रक ड्रायव्हरचे काम तुम्ही करू शकता. या कामात तुम्हाला विविध सामान एका शहरातून अथवा राज्यातून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे लागेल. तुम्ही ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या कंपनीकडे वाहनाची नोंदणी करू शकता. या माध्यमातून तुम्हाला अनेक कामे मिळतील व कमाई होईल. ही कमाई महिन्याला 30 ते 40 हजार रुपये असू शकते. |
कुरियर सेवा | कुरियर सेवा असे एक काम आहे, जेथे ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. तुम्ही किराणा सामान, पॅकेजेस, जेवण व इतर वस्तू पोहचविण्याचे काम करू शकता. विशेष म्हणजे यासाठी चारचाकी गाडी असण्याची देखील गरज नाही. तुम्ही दुचाकीच्या माध्यमातून हे काम करू शकता. याशिवाय, वृत्तपत्र, औषधे घरपोच पोहचविण्याचे काम करता येईल. |
सेल्स जॉब | तुमचे संभाषण कौशल्य चांगले असेल व सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास सेल्स अर्थात वस्तू व सेवांच्या विक्रीसंबंधित काम तुम्ही करू शकता. सेल्सच्या नोकरीसाठी अनेकदा प्रवास करावा लागतो. या कामात तुम्हाला नोकरीसोबतच कमिशन देखील मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही महिन्याला 20 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. विमा एजंट व रिअल एस्टेट एजंट कामासाठी देखील ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास फायदा होईल. |
ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर | वेगवेगळ्या प्रकारची वाहने चालविण्याचा अनुभव असल्यास ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता. या कामासाठी तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. तसेच, स्वतःची ड्रायव्हिंग स्कूल देखील सुरू करता येईल. |
वाहन चालवताना या गोष्टी ठेवा लक्षात
ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नोकरी सहज मिळू शकते. मात्र, काम करताना वाहन चालवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. याशिवाय, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोनवर बोलताना अथवा दारू पिऊन गाडी चालवू नये. तसेच, या कामामध्ये वाहनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे वाहनाची वेळोवेळी सर्व्हिसिंग करायला विसरू नये.