Four Wheeler Sale: भारतीयांचा कार खरेदीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दसरा दिवाळी महिनाभर लांब असली तरी आतापासूनच नागरिकांनी उत्सवाचा जल्लोष सुरू केला आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. 3 लाख 63 हजार 733 SUV आणि इतर श्रेणीतील कारची विक्री झाली. यात मारुती सुझुकी आघाडीवर आहे.
डिलर्सकडून कार्सची खरेदी सर्वाधिक
सणासुदीच्या काळात बाजारातील एकंदर उलाढाल 20 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्सवाच्या मुहूर्तावर खरेदीची सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. तसेच दसरा दिवाळीसाठी डिलर्स गाड्यांचा अतिरिक्त साठा करून ठेवण्यावरही भर देत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये गाड्यांची विक्री 2 टक्क्यांनी वाढली. तसेच शोरुममध्ये जास्तीत जास्त स्टॉक करून ठेवण्यासाठी डिलर्सकडून सुद्धा खरेदी वाढली आहे.
एंट्री लेवल गाड्यांची विक्री तुलनेने कमी आहे. मात्र, एसयुव्ही श्रेणीतील गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 20 लाख कार विक्रीचा टप्पा पहिल्यांदाच गाठला. तसेच सप्टेंबर महिन्यातील विक्री सर्वोत्तम असल्याचे मारुती सुझुकी कंपनीच्या मार्केटिंग विभागातील अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले.
सेमिकंडक्टरचा तुटवडा मिटला
केरळमधील ओणम सणापासूनच कार विक्री जोरात सुरू आहे. तर महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान, कार विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. गाड्यांची बुकिंग आणि विक्री दोन्हीही वाढत आहे. कोरोना काळात सेमिकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आता तोही सुरळीत झाल्याने कंपन्यांना तेजीत वाहन निर्मिती करता येत आहे.
मारुती सुझुकी लिडर
सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकीने 1,50,812 कारची विकी केली. तर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 148,380 गाड्या विकल्या होत्या. मारुतीच्या जिम्मी, ब्रेझा, ग्रँड वितारा या गाड्यांना चांगली मागणी आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ह्युंदाई कंपनीच्या 9% जास्त गाड्यांची विक्री झाली. सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 54,241 गाड्यांची विक्री केली.
ह्युंदाईच्या एक्स्टरसाठी 80 हजार बुकिंग
ह्युंदाई कंपनीच्या एक्स्टर या लेटेस्ट एसयुव्हीसाठी 80 हजार बुकिंग झाली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात एकूण विक्री झालेल्या गाड्यांपैकी दोन तृतीयांश SUV गाड्या आहेत. महिंद्रा कंपनीच्या 41,267 गाड्यांची विक्री सप्टेंबर महिन्यात झाली. दरम्यान, टाटा मोटर्सने निराशाजनक कामगिरी केली. मागील महिन्यात 6 टक्क्यांनी विक्री खाली आली.