Mamaearth IPO Memes: सोशल मीडिया तुम्हाला एका दिवसात प्रसिद्धी देते आणि एका दिवसात जमिनीवरही आपटते, याचा अनुभव ममाअर्थ या कंपनीला मागील काही दिवसांपासून येत आहे. कंपनीचा नफा तिच्या मुल्यांकनासोबत जुळत नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचे मुल्यांकन 1.2 बिलियन डॉलर होते. मात्र, एक वर्षानंतर लगेच त्यात अडीच पटीने वाढ झाली असून आता कंपनीचे मुल्यांकन 3 बिलियन डॉलर म्हणजेच 2 हजार 400 कोटी असल्याचे समोर आले आहे. मात्र, कंपनीचा नफा निव्वळ नफा सुमारे 14 कोटींच्या दरम्यान आहे.
कंपनीच्या मुल्यांकनावरुन सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सर्वप्रथम डिसेंबर महिन्यात रियटर्स या आघाडीच्या माध्यमाने ममाअर्थच्या आयपीओवरती बातमी दिली होती. यामध्ये ममाअर्थ कंपनी 3 बिलियन डॉलर मुल्यांकनावर 400 कोटी रुपये बाजारातून उभे करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, यावर कंपनीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
3 बिलियन म्हणजेच 2 हजार 400 कोटींच्या मुल्यांकनाची सकारात्मक बातमी असल्याने कदाचित कंपनीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कंपनीबाबत चांगली प्रतिमा निर्माण होत होती. मात्र, जेव्हा कंपनीच्या मुल्यांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा कंपनीकडून यावर उत्तर मिळाले नाही. या कंपनीच्या आयपीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून गुंतवणूकदारही सतर्क झाले आहेत.
काही गुंतवणूकदारांनी कंपनीच्या मागील काही वर्षातील कामगिरीचे विश्लेषण करून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. यावर चर्चा व्हायला लागल्यावर कंपनीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
कंपनीच्या सह-संस्थापक आणि शार्क टँक इंडियामध्ये सहभागी झालेल्या गझल अलग यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहून स्पष्टीकरण दिले. मात्र, यामध्ये कंपनीचे मुल्यांकन 24 हजार कोटी कसे झाले याचे उत्तर त्यांच्याकडेही नव्हते. सेबीकडे सादर केलेल्या कादपत्रांमध्ये 24 हजार कोटी मुल्यांकनाची माहिती नाही. मुल्यांकनाबाबतची प्रक्रिया पुढील काही दिवसांत होईल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र, एवढे जास्त मुल्यांकन एकाच वर्षात कसे झाले याबबात त्यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे आणखीनच शंका उपस्थित केली जात आहे.
आता जेव्हा कंपनीचा आयपीओ येईल तेव्हा मुल्यांकन कमी केले असेल तर ते का कमी केले याचे उत्तर कंपनीला द्यावे लागेल. पण जर 24 हजार कोटीचे मुल्यांकन तेवढेच ठेवले तर गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेली शंका दूर होणार नाही. त्यामुळे कंपनीने भविष्यात काहीही निर्णय घेतला तरी त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. झोमॅटो, आणि पेटीएम च्या आयपीओसोबत ममाअर्थची तुलना केली जात आहे.