दरमहिन्याला येणारे पगाराचे पैसे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संपतात, असे अनेकांची तक्रार असते. पैसे कुठे खर्च झाले, याची आकडेवारीही लक्षात येत नाही. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवून बचत वाढवायची असल्यास बजेट तयार करणे गरजेचे आहे. बजेटमुळे तुम्ही आर्थिक उद्दिष्ट तर गाठू शकताच. सोबतच विमा, गुंतवणूक व घर-गाडीचे हफ्ते असे आर्थिक टप्पेही पूर्ण करता येतील.
प्रामुख्याने पुरुषांसाठी बजेट तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. अविवाहित असो अथवा विवाहित, सर्वसाधारणपणे पुरुषांवर घरखर्चाची व कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे उत्पन्न, खर्च व गुंतवणुकीचे योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक
उत्पन्न | बजेटमधील सर्वात महत्त्वाचा भाग हा तुमचे उत्पन्न असते. तुम्हाला दरमहिन्याला मिळणारा पगार, बोनस, गुंतवणुकीतील परतावा अशी उत्पन्नाची आकडेवारी एकाच ठिकाणी लिहून ठेवल्यास नक्कीच फायदा होईल. |
खर्च | दरमहिन्याला घरातील विविध गोष्टींसाठी लागणारा खर्च नोंदवणे गरजेचे आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीचा खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, पालकांच्या हॉस्पिटल-विम्याचा खर्च, कर्जाचे हफ्ते अशी खर्चाची विभागणी करावी. |
गुंतवणूक | तुमचा पगार कितीही कमी अथवा जास्त असो, त्यातील काही भाग गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कारण, हीच गुंतवणूक भविष्यात तुमची मुलं, जोडीदार, पालकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी येईल. |
योग्य बजेट तयार करा
जोडीदाराशी चर्चा करा | बजेट तयार करताना तुमच्या जोडीदाराशी चर्चा करणे गरजेचे आहे. जोडीदाराचे उत्पन्न, खर्च याचा देखील तुमच्या बजेटमध्ये समावेश करा. |
मुलं-पालकांचा विचार करा | तुम्ही जर विवाहित असाल तर अशावेळी जोडीदार व मुलांची जबाबदारी देखील तुमच्यावर असते. याशिवाय, पालक जर तुमच्यावर निर्भर असल्यास त्यांच्या खर्चाचा देखील विचार करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच बजेट तयार करावे. |
गुंतवणुकीला द्या प्राधान्य | बजेट तयार करताना खर्च कमी करून गुंतवणुकीला सर्वाधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, आणीबाणीच्या स्थितीत हीच गुंतवणूक उपयोगी येईल. |
तज्ञांची मदत घ्या | बजेट तयार करण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता. आर्थिक सल्लागार तुमच्या खर्चाची योग्यप्रकारे मांडणीकरून कुठे गुंतवणूक करावी, याचा सल्ला देईल. |
सुखरूप भविष्याच्या दिशेने टाका पाऊल
गुंतवणूक करा | विवाहित पुरुषांच्या अविवाहित पुरुषांवरील जबाबदाऱ्या कमी असतात. त्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. याशिवाय, कमी वयात विमा काढल्यास प्रीमियमची रक्कम देखील कमी असते. लग्न झालेले असल्यास मुलं व जोडीदाराचा विचार करून म्युच्युअल फंड, इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. |
विमा काढा | नोकरीला लागल्यावर सर्वातआधी स्वतःचा व कुटुंबाचा विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. वयोवृद्ध आई-वडिलांच्या उपचारासाठी मोठी रक्कम खर्च होते. अशावेळी विमा काढलेला असल्यास तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्राप्त होते. |
मुदत ठेव | शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच सोने खरेदी करणे व बँकेत मुदत ठेव करणे देखील गरजेचे आहे. यामुळे भविष्यात कोणतीही अडचण आल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. |
थोडक्यात, लग्न झालेले असो अथवा नसो, पुरुषांनी घरखर्च व बचतीसाठी योग्यप्रकारे बजेट तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय, बजेट तयार करताना तुमच्यावर अवलंबून असलेल्या पालक, मुलं व जोडीदाराच्या भविष्याचा विचार करून गुंतवणुकीलाही प्राधान्य द्यावे.