Financial Security Gift On Fathers Day: 'फादर्स डे' हा दिवस वडिलांप्रती प्रेम, आदर, सन्मान, काळजी व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या भावना त्यांच्यापुढे व्यक्त करताना आपण त्यांना कपडे, टाय, शॉपिंग कार्डस, गॅझेटस यासारख्या पारंपरिक भेटवस्तू गिफ्ट करत असतो. परंतु यावर्षीच्या ‘फादर्स डे’ला तुम्ही तुमच्या वडिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करेल, अशा काही भेटवस्तू गिफ्ट करा. या भेटवस्तू त्यांना त्यांचे पुढील जीवन जगण्याचा मार्ग अधिक सुकर करण्यास मदत करेल. तसेच आर्थिक भेटवस्तू भेट केल्यास त्यांना तुमच्याकडून अप्रत्यक्षपणे का होईना, थोडीफार आर्थिक मदत होईल.
Table of contents [Show]
आरोग्य विमा भेट करा (Health Insurance)
उतारवयात अगदी गरज भासते ती योग्य अशा वैद्यकीय उपचारांची. त्यामुळे या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडिलांना आरोग्य विमा गिफ्ट करा. ही तुमच्या पालकांना तुम्ही दिलेली सर्वोत्तम भेट असेल. हा आरोग्य विमा तुमच्या वडीलांना या वयात तातडीच्या वेळी खर्च होणारा प्रचंड पैसा वाचविण्यास मदतीचा ठरु शकतो. परंतु, तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा निवडताना तुम्ही तो काळजीपूर्वक आणि सर्व समावेशक कव्हरेज असलेला निवडायला हवा. जेणे करुन पुढे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.
आपत्कालीन निधी जमा करण्यास मदत करा (Emergency Fund)
आपत्कालीन निधी हा बचत केलेला असा निधी असतो, जो अचानक उध्दभवलेली वैद्यकीय समस्या, नोकरी गमावल्या नंतरची वेळ, घराची दुरुस्ती, यासारख्या अनपेक्षित खर्चांसाठी खर्च केल्या जातो. त्यामुळे तुम्ही यावेळी तुमच्या वडीलांना असा आपत्कालीन निधी एखाद्या ज्येष्ठ नागरिक योजनेच्या स्वरुपात, एफडी स्वरुपात त्यांना गिफ्ट करु शकता. त्यामुळे अतिशय योग्यवेळी तो त्यांना खर्च करता येईल आणि गरज असताना दुसऱ्या कुणापुढे मदत मागावी लागणार नाही.
कर्ज फेडण्यास मदत करा (Loan Repayment)
तुमच्या वडिलांना त्यांचे थकित कर्ज भरण्यास तुम्ही केलेली मदत, यासारखी दुसरी चांगली भेटवस्तू असू शकत नाही. तुम्ही केलेल्या या मदतीमुळे तुमच्या वडिलांना मानसिक आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही लाभेल. तेव्हा, तुम्ही तुमच्या वडिलांशी थकित कर्जावर चर्चा करा, तुम्ही त्यांना किती रुपयांची मदत करु शकता, ते स्पष्ट सांगा. असे केल्यास कर्जावर भरल्या जाणारे व्याज आणि कर्ज दोन्ही कमी होईल.
दीर्घ गुंतवणुकीचा एखादा प्लॅन गिफ्ट करा (Investment Plan)
आपण जमा केलेली संपत्ती वाढवण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे या दिवशी तुमच्या वडिलांना दीर्घकालीन गुंतवणूकीचा एखादी प्लॅन गिफ्ट करा. जसे की, एसआयपी, पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, एखादी सुवर्ण बॉण्ड यासारखी कुठलीही योजना गिफ्ट केल्यास, त्यांना त्यांच्या अडचणीच्या आणि गरजेच्या काळात उपयोगी पडेल.
पेन्शन योजना गिफ्ट करा (Pension Scheme)
ज्येष्ठ नागरिकांची महिन्याची आर्थिक गरज लक्षात घेता, अनेक विमा कंपन्यांनी पेन्शन प्लॅन तयार केले आहे. जर तुमच्या वडीलांना सरकारकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन मिळणार नसेल, तर तुम्ही गिफ्ट केलेला पेन्शन प्लॅन त्यांच्या प्रचंड उपयोगी ठरणार आहे. तेव्हा तुम्ही भारत सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेली नॅशनल पेन्शन योजना, एनपीएस प्लॅन, ईपीएस प्लॅन, एलआयसी द्वारे दिल्या जाणारा पेन्शन प्लॅन यासारख्या सरकारी योजना किंवा खाजगी विमा कंपनीद्वारे विकल्या जाणाऱ्या पेन्शन योजनांपैकी एखादी योजना गिफ्ट करु शकता.