केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने येत्या 1 जूनपासून विविध श्रेणींच्या वाहनांसाठी थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे कारच्या विमा खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दुचाकीसाठीही वाढीव इन्शुरन्स प्रीमियम मोजावा लागणार आहे.
संबंधित केंद्रीय खात्याने अधिसूचित केलेल्या सुधारित दरांनुसार, 1 हजार सीस (1000 CC) इंजिन क्षमतेच्या खाजगी कारच्या विम्यासाठी आता 2,094 रूपये मोजावे लागणार आहेत. 2019-20 मध्ये या कारसाठी 2,072 रूपये मोजावे लागत होते. तसेच 1 हजार ते 1500 सीसी (1000 CC आणि 1500 CC) इंजिन क्षमतेच्या खाजगी वाहनांच्या इन्शुरन्ससाठी 3,416 रूपये भरावे लागणार आहेत. पूर्वी यासाठी 3,221 रुपये भरावे लागत होते. तर 1500 सीसी (1500 CC) पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांचा प्रीमियम 7 रूपयांनी कमी करण्यात आला आहे. पूर्वी या वाहनांसाठी 7,897 रूपये आकारले जात होते. आता 7,890 रुपये भरावे लागणार आहेत.
150 सीसीपेक्षा अधिक पण 350 सीसीपेक्षा कमी असलेल्या दुचाकींसाठी 1,366 रुपये प्रीमियम आकारला जाणार आहे. तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या दुचाकींसाठी सुधारित 2,804 रूपये प्रीमियम आकारला जाणार आहे. यापूर्वी, थर्ड पार्टी (TP) इन्शुरन्सचे दर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे अधिसूचित केले गेले होते. विमा नियामकाच्या सल्ला मसलतीनंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) थर्ड पार्टीचे दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रीमियमवर 7.5 टक्के सूट दिली जाईल. 30KW पेक्षा अधिक नसलेल्या इलेक्ट्रिक खाजगी कारसाठी 1,780 रुपये प्रीमियम आकारला जाईल. तर 65 KW पेक्षा अधिक नसलेल्या 30 KW पेक्षा अधिक असलेल्या कारसाठी 2,904 रुपये प्रीमियम आकारला जाणार आहे.
12,000 किलोपेक्षा अधिक परंतु 20,000 किलोपेक्षा अधिक नसलेल्या व्यावसायिक वाहनांसाठीचा प्रीमियम हा 2019-20 मधील 33,414 रुपयांवरून आता 35,313 रुपयांपर्यंत वाढेल. 40,000 किलोपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत इन्शुरन्स प्रीमियम 2019-20 मधील 41,561 रुपयांच्या तुलनेत आता 44,242 रुपये होईल.
थर्ड-पार्टी इन्शुरन्स कव्हर (cover) हा स्वत:चे नुकसान भरून काढण्यासोबतच इतरांसाठीही फायदेशीर आहे. तसेच वाहन मालकाने खरेदी केलेल्या स्वत:च्या नुकसान कव्हरसह अनिवार्य आहे. हे विमा संरक्षण थर्ड पार्टीला सामान्यत: एखाद्या व्यक्तीला, रस्ता अपघातामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी लागू आहे.
नव्याने जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार, शैक्षणिक संस्थांच्या बससाठी 15 टक्के सूट देण्यात आली आहे. तर व्हिंटेज कार म्हणून नोंदणीकृत खाजगी कारला प्रीमियमच्या 50 टक्के सवलतीच्या दरात परवानगी देण्यात आली आहे.