देशात अनेक बँका आहेत त्याचबरोबर त्यांचे व्याजदरदेखील (Interest rate) विविध आहेत. बँक एफडीमध्ये (Fixed deposit) कोणतीही जोखीम नसते. व्याज देखील स्थिर राहतं. आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यानंतर बँक एफडीच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक लघु वित्त बँका (Small finance banks) अजूनही एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. यात साधारणपणे तीन वर्षात मुदत ठेवींवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणार्या बँका कोणत्या, यावर एक नजर टाकू...
Table of contents [Show]
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेबद्दल बोलायचं झाल्यास, ही बँक 889 ते 1095 दिवसांची मॅच्युरिटी असणाऱ्या एफडीवर 8 टक्के दरानं व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीवर 8.5 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक एफडी
फिनकेअर ही देखील एक स्मॉल फायनान्स बँक आहे. बँक 1001 ते 1095 दिवसांच्या एफडीवर 8 टक्क्यांच्या दरानं व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीवर 8.6 टक्के इतक्या दरानं व्याज उपलब्ध असणार आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
या बँकेचा नुकताच आयपीओ आला, त्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेनदेखील आकर्षक व्याजदर देऊ केला आहे. 1000 ते 1500 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 8.25 टक्के दरानं बँक व्याज देत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीवर 8.85 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सर्वसामान्यांसह ज्येष्ठ नागरिकांना उत्तम सेवा देणारी एक बँक म्हणजे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. बँकेमार्फत 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.6 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. दुसरीकडे, बँक ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 9.1 टक्के दरानं व्याज देत आहे.