देशातील 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णत: सुरू असलेली आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशत: सुरू असलेली कर्मचारी राज्य विमा (ESIC) योजना आता संपूर्ण देशभर लागू केली जाणार आहे. देशातील उर्वरित 148 जिल्ह्यांसह देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना पूर्णत: लवकरच लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) योजना 2022 च्या अखेरीस देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.19 जून) झालेल्या ESIC च्या 188 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेद्वारे देशभरात वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार केला जाणार आहे.
काय आहे ESIC योजना?
सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना (Employees States Insurance corporation - ESIC) आहे. ज्या संस्थांमध्ये 10 ते 20 कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतात. त्यांना ही योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबविली जाते. ESIC योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपनी असे दोघांचे आंशिक योगदान असते. सध्या ESIC योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 0.75 टक्के तर कंपनीकडून 3.25 टक्के योगदान दिले जाते. ज्या कर्मचाऱ्याचे दैनंदिन वेतन 137 रुपये आहे; त्यांना या योजनेसाठी आपल्या वेतनातील योगदान द्यावे लागत नाही. 21 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेले कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अंशत: जिल्ह्यांतूनही पूर्ण सुविधा देणार
सध्या देशातील 153 जिल्ह्यांमध्ये ESIC योजना अंशत: सुरू आहे. आता नवीन घोषणेनुसार वर्षा अखेरीस या 153 जिलह्यांमध्येही पूर्णता: ही योजना लागू केली जाणार आहे, असे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. या जिल्ह्यांमध्ये नवीन दवाखाने आणि सहयोगी शाखा कार्यालये (DCBOs) स्थापन करून पूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सरकारने ESIC अंतर्गत देशभरात 2,300 खाटांची नवीन रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात 6 नवीन रुग्णालये
या योजने अंतर्गत काही राज्यांमध्ये नवीन रूग्णालये उभारली जाणार आहेत. महाराष्ट्रात 6, हरियाणात 4, तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 2 रुग्णालये उभारली जाणार आहेत. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाणार आहे, असे कामगार मंत्रालयाने म्हटलं आहे.
image source - https://bit.ly/3OvMykd