जसा गल्ली गल्लीत वडापाव मिळतो तसंच आता गल्लीत गल्ली सॅन्डवीच सुद्धा मिळतं. या सॅन्डवीचचे खूप प्रकार आहेत. त्यानुसार त्यांच्या किंमतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. जसं आपल्याकडे जेवण केलं नसेल तर वडापाव खाऊन वेळ मारुन नेतो. अगदी तसंच पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा जेवायचं नसेल तर सॅन्डवीच किंवा बर्गरवर वेळ भागवली जाते. तर अशा या सॅन्डवीचची साधारण किंमत किती असू शकते असं तुम्हाला वाटतं?
आपल्याकडे एका छोट्याशा टपरीवर 25 रूपयातं मिळतं. हॉटेलमध्ये 100 ते 200 रूपयाच्या आसपास सॅन्डवीच मिळतं. तर सॅन्डवीचच्या स्पेशल शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला 300 ते 500 रूपयापर्यंतचं सॅन्डवीच मिळू शकतं. पण जर 17,500 रूपयाचं सॅन्डवीच असतं असं तुम्हाला कोणी सांगितलं तर… विश्वासच बसणार नाही ना. हे खरं आहे. जगामध्ये 17,500 रूपयाचं सॅन्डवीच अस्तित्वात आहे.
कुठे मिळतं हे महागडं सॅन्डवीच
न्यू-यॉर्कमध्ये सिरेनडिप्टी 3 नावाचं एक रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये हे महागडं सॅन्डवीच बनवलं जातं. या सॅन्डवीचचं नाव आहे ‘द क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सॅन्डवीच.’ या सॅन्डवीचची किंमत आहे 214 अमेरिकन डॉलर. भारतीय चलनानुसार 17,500 रूपयाचं. या सिरेनडिप्टी 3 या रेस्टॉरंटने आपलं हे स्पेशल सॅन्डवीच पुन्हा रिलाँन्च केलं आहे. तरी हे स्पेशल सॅन्डवीच काही काळापुरचाच उपलब्ध असणार आहे.यासंदर्भात सिरेनडिप्टी 3 रेस्टॉरंटने आपल्या इन्टाग्रामवर पोस्ट करुन माहिती दिलीये.
हे सॅन्डवीच का आहे महाग
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 2014 साली ‘द क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सॅन्डवीच’ ची नोंद सर्वात महागडं सॅन्डवीच म्हणून केली होती. तर मुळात 17,500 रूपयाच्या सॅन्डवीचमध्ये नेमकं असं काय हा प्रश्न आपल्याला पडला असेल. जगातलं दुर्मिळ चीज, सोन्याच्या वर्ख आणि आणखी काय-काय असतं पाहुयात.
द क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सॅन्डवीचमध्ये डॉम पेरिग्नोन शॅम्पेनपासून बनवलेल्या फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेड वापरतात. या ब्रेडला ट्रफल बटर आणि व्हाईट ट्रफल ऑईल लावलं जातं.या ब्रेडमध्ये जगात दुर्मिळ असलेलं कॅसिओकॅव्हॅलो पोडोलिको चीज वापरलं जातं. हे चीज फक्त इटलीमध्येच मिळतं. इटलीमध्ये पोडोलिका जातीच्या गायीच्या दुधापासून हे चीज बनवलं जातं. मुळात या जातीच्या गायी फक्त मे आणि जून महिन्यांमध्ये दुध देतात त्यामुळे हे चीज दुर्मिळ चीज म्हणून ओळखलं जातं. या दुर्मिळ चीजमुळे या सॅन्डवीचची किंमत जास्त आहे. त्याला सोबत आहे ती म्हणजे सोन्यांचा वर्ख. या सॅन्डवीचमध्ये आपण खाऊ शकतो अशा 23 कॅरेट सोन्यांचा वर्ख दिलेला असतो. त्यामुळे साहजिकच आहे या सॅन्डवीचची किंमत हजाराच्या घरात असणारच. या सॅन्डवीच सोबत साउथ आफ्रिकन लॉबस्टर टॉमेटॉ बिस्क्यु या सॉससोबत सर्व्ह केलं जातं.असं हे सॅन्डवीच सिरेनडिप्टी 3 रेस्टॉरंटमध्ये रेडी मिळत नाही. यासाठी तुम्हाला 8 आधी ऑर्डर द्यावी लागते तेव्हाच तुम्हाला हे सॅन्डवीच मिळू शकतं.
जगातली इतर महागडी सॅन्डवीचेस
ब्रेडेड वॉग्यु बीफ कटलेट सॅन्डवीच 14.600 रूपयाचं (180 डॉलर) हे सॅन्डविच जापनिज बिफपासून बनवलेलं असतं. 13,800 रूपयाचं (170 डॉलर) चेडर चीजपासून बनवलेलं चीज सॅन्डवीच, 12,240 रूपयाचं (150 डॉलर) वॉन इसेन प्लॅटिनम क्लब सॅन्डवीच जगातले महागडे सॅन्डवीच म्हणून ओळखले जातात.