Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST : जीएसटी भरणा श्रीमंतांपेक्षा गरीबांचाच जास्त, काय सांगतोय ऑक्सफॅम इंडियाचा रिपोर्ट?

GST : जीएसटी भरणा श्रीमंतांपेक्षा गरीबांचाच जास्त, काय सांगतोय ऑक्सफॅम इंडियाचा रिपोर्ट?

GST : देशात जीएसटी भरणाऱ्यांमध्ये श्रीमंत व्यक्तींपेक्षा गरीबांनी बाजी मारलीय. मात्र दुर्दैवी बाब अशी, की यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढत आहे. ऑक्सफॅम इंडियानं याविषयीचा सविस्तर अहवाल दिलाय. या अहवालातून भारतातल्या श्रीमंत आणि गरीब यांच्यातला फरक स्पष्टपणे दिसून येतोय.

वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी (Goods and services tax) सरकारनं सुरू केला. देशात विविध प्रकारचे टॅक्स ठेवण्यापेक्षा एकाच टॅक्सच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळण्यासाठीचा हा करप्रकार आहे. मात्र याविषयीची एक दुर्दैवी बाब समोर आलीय. ऑक्सफॅम इंडियाच्या (Oxfam India) अहवालातून ही बाब ठळकपणे समोर आलीय. या अहवालानुसार, देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी झपाट्यानं वाढताना दिसत आहे. भारतात अब्जाधीशांकडे प्रचंड पैसा आहेच. त्यातला काही अंशच कदाचित एखाद्या गरीबाकडे असेल. मात्र असं असतानादेखील तो सरकारचा टॅक्स म्हणजेच जीएसटी भरत आहे विशेषत: श्रीमंतांपेक्षा जास्तीचा टॅक्स तो भरत आहे. झी बिझनेसनं ऑक्सफॅम इंडियाच्या रिपोर्टसंदर्भातलं वृत्त दिलंय.

आकडेवारी धक्कादायक

ऑक्सफॅम इंडियाच्या 'सर्व्हायव्हल ऑफ रिचेस्ट इंडिया स्टोरी' या रिपोर्टमधली आकडेवारी अतिशय धक्कादायक स्वरुपाची असल्याचं दिसून येतंय. या रिपोर्टनुसार देशातले 50 टक्के गरीब श्रीमंतांच्या तुलनेत 64 टक्के जास्त जीएसटी भरतात. श्रीमंतांपेक्षा गरीबांवरच सरकार जास्त कर लादत असल्याचं वास्तव यानिमित्त पुढे आलंय. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) देशात विक्रमी जीएसटीचं संकलन झालं. मात्र ते भरणाऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास धक्कादायक आणि आश्चर्यकारक अशी तथ्ये समोर आली आहेत. जीएसटी भरणाऱ्यांमध्ये बहुतांश गरीब किंवा सामान्य माणूस असल्याचंच दिसून येतंय.

मार्चमध्ये विक्रमी जीएसटी

मार्च महिन्यात यंदा विक्रमी जीएसटी संकलन झालं. मार्च महिन्यात एकूण जीएसटी संकलन 29,546 कोटी रुपये इतकं होतं. त्याचवेळी सीजीएसटी हे 37,314 कोटी रुपये आणि एसजीएसटी 82,907 कोटी रुपये इतकं नोंदवलं गेलं आहे. या जीएसटी संकलनामध्ये 42,503 कोटी रुपयांच्या आयातीतून जमा केलेल्या आयजीएसटीचाही समावेश आहे. तर 10,355 कोटी रुपयांचा उपकरही समाविष्ट आहे. सरकारनं जुलै 2017मध्ये जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली. सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीएसटी अशा विविध प्रकारात जीएसटी वसूल केला जातो. यात गरीबांनी अधिक टॅक्स दिलाय.

गरीब-श्रीमंतांचं असंतुलन

भारतात अब्जाधीशांची संख्या जवळपास 1 टक्के इतकी आहे. या एक टक्क्याचं प्रमाण असलेल्या अब्जाधीशांकडे देशातली तब्बल 60 टक्के संपत्ती आहे. देशातील 3 टक्के संपत्ती जवळपास 50 टक्के लोकांकडे आहे. मात्र तरीही 2021-22मध्ये जीएसटी भरणाऱ्यांचं प्रमाणं धक्कादायक असल्याचं दिसतंय. सर्वाधिक जीएसटी 64 टक्के सामान्य माणसांकडून आणि गरिबांकडून म्हणजेच तुलनेनं कमी श्रीमंतांकडून गोळा करण्यात आलाय. मात्र त्याचवेळी, 10 टक्के श्रीमंतांकडून 3 टक्के जीएसटी गोळा करण्यात आलाय. या असंतुलनामुळे देशातला गरीब आहे तिथेच किंवा मागे चाललाय तर श्रीमंत मात्र दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत.

काय आहे ऑक्सफॅम इंडिया?

भेदभाव संपवण्यासाठी तसंच मुक्त आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांची ऑक्सफॅम इंडिया ही एक चळवळ आहे. आदिवासी, दलित, मुस्लीम त्याचपमाणं अनौपचारिक क्षेत्रातले कामगार, विशेषकरून स्त्रिया आणि मुलींना त्यांचे विचार, बोलण्याचं स्वातंत्र्य, त्यांचे हक्क समजण्याच्या समान संधी आणि भेदभावमुक्त भविष्य यासह सुरक्षित आणि हिंसा-मुक्त जीवन जगण्यास मिळावं म्हणून ऑक्सफॅम काम करतं. याच संस्थेनं जीएसटी आणि त्यात होणारा भेदभाव खऱ्या अर्थानं उघड केलाय. दरम्यान, ऑक्सफॅम इंडियाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.