सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. विपुल शाह (Vipul Shah) निर्मित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट सिनेमागृहात 5 मे 2023 ला शुक्रवारी प्रदर्शित झाला. वेगवेगळ्या कारणास्तव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याला अनेकांनी विरोध केला होता. मात्र या सर्व आव्हानांना मागे टाकत अखेर 'द केरला स्टोरी' सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एवढा मोठा विरोध असताना देखील या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ज्यामुळे असा विश्वास व्यक्त केला जातोय, की विकेंडच्या दोन दिवसात चित्रपट कोटींची कमाई करेल. ओपनिंग डेला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नेमका किती गल्ला जमवला, जाणून घेऊयात.
पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. लोक या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत. उत्तम आशय आणि सत्य घटनेमुळे या चित्रपटाला लोकांची पसंती पाहायला मिळत आहे. Sacnilk या रिपोर्टनुसार या चित्रपटाने ओपनिंग डे ला बॉक्स ऑफिसवर 7.5 ते 8 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाचे एकूण बजेट 40 कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. सलग दोन दिवस लागून विकेंड आल्याने हा चित्रपट बजेटहून जास्तीची कमाई करेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
Source: Sunshine Pictures
'द केरला स्टोरी'ची स्टार कास्ट जाणून घ्या…
चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर अदा शर्मा (Adah Sharma), योगिता बिहानी (Yogita Bihani), सिद्धी इदनानी (Siddhi Idnani) आणि सोनिया बालानी (Sonia Balani) यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यातील अदा शर्माच्या अभिनयाचे खास करून प्रेक्षक कौतुक करत आहेत. 'द केरला स्टोरी'चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन (Sudipto Sen) यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह (Vipul Amrutlal Shah) यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे.
चित्रपटाचे कथानक काय आहे?
'द केरला स्टोरी'चे कथानक हे केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे. ज्या महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर केले जाते. धर्मांतरानंतर या महिलांना ISIS या दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामील केले जाते याचे उत्तम चित्रण चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला असून एका विशिष्ट समुदायाने या चित्रपटावर आक्षेप देखील घेतला आहे. सध्या हा चित्रपट सर्व वादांच्या दरम्यान सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Source: timesnownews.com