श्रावण महिना सुरु झालाय. आता सण-समारंभ सुरु होतील. त्यांनतर दसरा आणि दिवाळी देखील येईल. गोडधोड बनवलं जाईल. तुमच्यापैकी अनेक लोक आधीच तयारीला लागले असतील. मात्र एकीकडे देशभरात टोमॅटो, कांदे, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण यांचे भाव वाढलेले असतानाच साखरेचे बाव देखील वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागू शकते. यावर्षी देशांतर्गत झालेले साखरेचे उत्पादन, किरकोळ महागाईचा वाढता दर लक्षात घेता, केंद्र सरकारने काही खास उपापयोजना आखल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने मंगळवारी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी साखरेच्या किमतीत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सरासरी 25% भाववाढ नोंदवण्यात आली होती. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर गेल्या काही वर्षात 2% भाववाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या साखरेचे भाव नियंत्रणात असले तरी येत्या काही दिवसांत भाववाढीची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Government allocates addl 2L metric tonnes quota of sugar ahead of festival seasonhttps://t.co/gpoIPiNsvj#Commodity #Government #Sugar #Investmentguruindia pic.twitter.com/8ODECGjkhr
— Investment Guru India (@InvGurInd) August 23, 2023
या घोषणेमुळे बाजारात साखरेची आवक वाढेल तसेच मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडणार नाही अशी सरकारला आशा आहे. या घोषणेनंतर ऑगस्ट महिन्याचा साखरेचा एकूण कोटा 25.50 लाख मेट्रिक टन (LMT) वर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 2 लाक मेट्रिक टन साखरेचा अतिरिक्त कोटा बाजारात उपलब्ध करून दिला आहे. खाद्य व अन्न सुरक्षा मंत्रालयाच्या देखरेखीखाली देशभरात साखरेचे वितरण केले जाणार आहे. देशभरात साखरेच्या किंमती स्थिर राहण्यास यामुळे मदत मिळणार आहे.