Supremo Trophy Winner 2023: मुंबईतील टेनिस क्रिकेट रसिकांचे आकर्षण ठरलेली सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचा थरार रविवारी संपला. या थरारात ठाण्याच्या शौर्या हरशित टीमने अहमदनगरमधील शिरसाठ स्पोर्टसला नमवत पहिल्या क्रमांकाचे 11 लाख रुपयांचे बक्षिस पटकावले आहे. रनरअप ठरलेल्या शिरसाठ स्पोर्ट्सला 9 लाखांचे प्राईज देण्यात आले.
टेनिस क्रिकेट रसिकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या सुप्रिमो चषकाचा थरार 17 मे पासून सुरू झाला होता. तो रविवारी (दि. 21 मे) संपला. सांताक्रूझ परिसरातील शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत गेली 10 वर्षांपासून टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी या स्पर्धेत 16 टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुंबई, पुणे, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर, उरण, अहमदनगर आणि ठाणे येथील टीम सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे दिल्लीमधील धमाका क्लब, कोलकातामधील उमर एक्सआय, कर्नाटकामधील एफएम हॉसपेट, आणि गुजरातधील रॉयल एकता या टीम्स या स्पर्धेचे आकर्षण होत्या.
पहिल्या क्रमांकाला 11 लाखांचे बक्षिस
गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सांताक्रूझमधील एअर इंडिया ग्राऊंडवर या क्रिकेट सामन्यांचा थरार रंगला होता. या थरारामधील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 11 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. तर रनर-अप टीमसाठ 9 लाख रुपयांचे बक्षिस होते. पहिल्या क्रमांकाचे 11 लाख रुपयांचे बक्षिस आणि चांदीची ट्रॉफ ठाण्याच्या शौर्या हरशित टीमने तर दुसरा क्रमांक अहमदनगरच्या शिरसाठ स्पोर्ट्स टीमने पटकावले आहे.
खेळाडुंवर हजारो रुपयांच्या बक्षिसांची खैरात!
सुप्रिमो चषक हा फक्त मॅचेसमधील प्राईसमुळे लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही. तर या चषकाचे ज्या पद्धतीने आयोजन केले जाते. त्याचे नियोजन, प्रक्षेपण अशा सर्व गोष्टींमुळे सुप्रिमो चषक हा आता मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधील मानाचा चषक बनला आहे. यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज हा शौर्य स्पोर्ट्स क्लबचा विश्वनाथ जाधव याने पटकावला. या किताबासाठी मारूती सुझुकीची एक्सप्रेसो ही कार भेट देण्यात आली. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनचा किताब एजाज कुरेशी, बेस्ट बॉलर इमरोझ आणि बेस्ट फिल्डरसाठी स्कूटर भेट देण्यात आली.