मे महिना म्हटले की गावोगावी लाखो रुपयांची बक्षीसे असणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट हे समीकरण मागील काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे. टेनिस क्रिकेटचा हंगाम आता कुठे सुरु झालाय. राज्यात आणि मुंबईतील काही मानाच्या टेनिस टुर्नामेंट्सला आता कुठे रंग चढू लागला आहे. टेनिसची आयपीएल समजल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषकाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. अशाच काही फेमस टेनिस टुर्नामेंटची माहिती घेऊया.
नुकताच युनिटी ग्रुपकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुंब्रा येथे खासदार प्रिमीयर लीग आयोजित करण्यात आली होती. टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत एका संघात चार आयकॉन खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या संघाला 2.5 लाख उपविजेत्या संघाला 1.5 लाखाचे बक्षीस देण्यात आले.
भिवंडीत 'केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक' ही टेनिस स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत विजेत्या संघाला 11 मोटारसायकल दिल्या जातात. उपविजेत्या संघाला 6 बाईक्स आणि 3 बाईक्स दिल्या जातात. बक्षीस म्हणून मोटारसायकल देण्याचे खास वैशिष्ट्य राज्यमंत्री पंचायत राज चषक टेनिस टुर्नामेंटचे आहे.
भिवंडीतील आणखी एक लोकप्रिय टुर्नामेंट म्हणजे 70-70 AA प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅश टेनिस टुर्नामेंट आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 50 हजारांची प्रवेश फी असते. विजेत्या संघाला 7 लाख तर उपविजेत्या संघाला 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते. याशिवाय मुंबईत प्रहार चषक, डोंबिवलीतील रतन बुवा पाटील चषक अशा टेनिसमधील महत्वाच्या टुर्नामेंट्सची टेनिस क्रिकेटमध्ये वेगळी ओळख आहे.
मुंबईत आजपासून सुप्रिमोचा थरार
राज्यातले युवा क्रिकेटपटू ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्या सुप्रिमो चषकाला मुंबईत सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत सुप्रिमो चषक आयोजित केला जातो. यंदा ही स्पर्धा 17 ते 21 मे 2023 या दरम्यान मुंबईत होणार आहे. युट्यूबवर लाईव्ह दाखवल्या जाणाऱ्या सुप्रीमोचा थरार 22 देशातील टेनिस क्रिकेट चाहत्यांना घेता येणार आहे. सुप्रिमो टुर्नामेंटला विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती हजेरी लावत असतात. यंदाच्या स्पर्धेत राज्यातील 16 सर्वोत्तम संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला चांदीचा भव्य चषक, उत्कृष्ट क्रिकेटपटूंना कार, बाईक्स आणि रोख बक्षीसे दिली जातात. वर्ष 2010 मध्ये सुप्रिमो टुर्नामेंटला सुरुवात झाली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर टेनिस क्रिकेटची प्रचंड क्रेझ
भारताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर टेनिस क्रिकेटची क्रेझ वाढत आहे. सौदी अरेबियात इलाईट कप ही टेनिस क्रिकेटची मोठी टुर्नामेंट मे महिन्यात आयोजित केली जाते. नुकताच पार पडलेल्या या टुर्नामेंटमध्ये आशिया आणि मध्य पूर्वेतील 12 संघानी सहभाग घेतला होता. यात आशिया खंडातील टेनिस क्रिकेटमधील 200 टॉपचे क्रिकेटपटू सहभागी झाले होते. विजेत्यांना जवळपास 13 लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली. या टुर्नामेंटसाठी भारतातील टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडूंना लाखो रुपये मोजून विशेष आमंत्रित केले जाते.
बारामतीमध्ये होणार स्टेट लेव्हल टेनिस टुर्नामेंट
यंदा प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात टेनिसक्रिकेटडॉटइन या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. येत्या 24 ते 27 मे 2023 या दरम्यान बारामतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.या स्पर्धेत उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र (अ), पश्चिम बंगाल हे संघ अ गटात आहे.पंजाब- हरियाणा, महाराष्ट्र (ब), राजस्थान आणि गुजरात हे चार संघ ब गटात आहेत.