मागील तीन वर्षांपासून दुखापतींनी हैराण झालेल्या टेनिस स्टार रॉजर फेडररने गेल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली होती. फेडरर शुक्रवारी 23 सप्टेंबर 2022 रोजी अखेरचा सामना खेळला. टेनिस कोर्टावरील अखेरचा भाषणात फेडररना अश्रू अनावर झाले. एक प्रोफेशनल टेनिस प्लेअर म्हणून रॉजर फेडररने 24 वर्षात 550 मिलियन डॉलर्सची संपत्ती (भारतीय चलनात जवळपास 4500 कोटी रुपये) कमावली. जागतिक बाजारातील अनेक बड्या उत्पादनांचा तो ब्रॅंड अॅम्बेसेडर बनला.
जागतिक टेनिस क्रमवारीत दिर्घकाळ पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या रॉजर फेडररने 20 ग्रॅंडस्लॅम, 2 ऑलंपिक मेडल, 103 टायटल्स आणि 1256 वैयक्तिक सामने जिंकण्याचा पराक्रम केला. जुलै 2012 मध्ये टेनिसच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला होता. त्यानंतर सलग 310 आठवडे त्याने क्रमवारीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये फेडररने 8 वेळा विम्बल्डन, 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच आणि यूएस ओपन प्रत्येकी 5 वेळा जिंकले.
टेनिस जगतात रॉजर फेडरर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला तो 2001 मधील विम्बल्डन स्पर्धेत. या स्पर्धेत 15 वे मानांकन मिळवलेल्या फेडररने चारवेळा विम्बल्डन चॅम्पियन पीट सॅम्प्रसचा पराभव केला होता. त्यानंतर फेडररने कधीच मागे वळून पाहिले नाही. ग्रास कोर्ट असो वा क्ले कोर्ट त्याचा जोश आणि दरारा स्पर्धेगणिक वाढत होता.
रॉजर फेडररची एकूण संपत्ती 550 मिलियन डॉलर इतकी आहे. त्यातील 130 मिलियन डॉलर्स त्याला दोन दशकांत मिळालेली बक्षिसाची रक्कम आहे. प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षी फेडररने केवळ 2800 डॉलरची कमाई केली होती. आज निवृत्तीवेळी त्याची कमाई तब्बल 129 मिलियन डॉलर्स इतकी वाढली आहे. एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या टेनिस खेळाडूंच्या वार्षिक कमाईच्या तुलनेत ही तिसरी मोठी कमाई आहे. नदाल वर्षाकाठी 131.6 मिलियन डॉलर्स आणि जोकोविच 145 मिलियन डॉलर्सची कमाई करतात.
दुखापतींनी फेडरर टेनिस खेळू शकला नसला तरी कॉर्पोरेटमध्ये त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू जबरदस्त असल्याचे दिसून आले आहे. फेडरर हा जागतिक पातळीवरील सर्वात महागड्या अॅथेलिटपैकी एक आहे. वर्ष 2022 मध्ये टेनिसमधून फेडररने केवळ 7,00,000 डॉलर्सची कमाई केली तर जाहिरातीतून त्याला 90 मिलियनचे उत्पन्न मिळाले. यावरुन फेडररचे ब्रॅंड व्हॅल्यू किती आहे हे दिसून येते. रोलेक्स, मर्सिडिज बेंझ. क्रेडिट सूस या ब्रॅंडच्या तो जाहिराती करतो. फेडररने एका स्वीस फूटवेअर ब्रॅंडमध्ये गुंतवणूक देखील केली आहे.
भावूक क्षण, फेडररला अश्रू अनावर
फेडरर शुक्रवारी लाव्हेर कपमध्ये शेवटचा सामना खेळला. या विशेष सामन्यानंतर फेडररने टेनिस रसिकांचे आभार मानले. कुटुंबातील सदस्यांचे विशेषत: मुलगा, पत्नी, आई-वडील यांच्याविषयी बोलताना फेडररला अश्रू अनावर झाले. या भावूक क्षणाला कोर्टवर उपस्थित फेडररचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल यालाही अश्रू आवरता आले नाहीत. फेडरर पुन्हा टेनिस कोर्टवर दिसणार नाही, या विचाराने संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झाले होते. सर्वांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली.
स्वित्झर्लंड आणि दुबईत आलिशान घर
मूळचा स्वित्झर्लंडचा असलेल्या फेडररचे मायदेशात प्रशस्त घर आहे. झुरिच लेकजवळ फेडररचा काचेचा बंगला आहे. याची किंमत जवळपास 6.5 मिलियन पाउंड इतकी आहे. त्याशिवाय दुबईत देखील रॉजर फेडररचे घर आहे. फेडररकडे 6 लक्झुरी कार्सचे कलेक्शन आहे. त्यात 5 मर्सिडिज असून एक एसयूव्ही आहे.
source: twitter.com