जागतिक मंदीची शक्यता निर्माण झाली असून त्याचा सर्वाधिक फटका सेवा क्षेत्राला बसला आहे. 2022-23 आर्थिक वर्षाच्या चौथ्या म्हणजेच शेवटच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात नोकर कपात झाली. अॅमेझॉन, मेटा, सेल्सफोर्स, ट्विटर, गुगल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनाही नोकर कपात केली. नवीन वर्ष सुरू होऊन अवघे पंधरा दिवस उलटले आहे. नववर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसांत जगभरातील आयटी कंपन्यांनी दरदिवशी सरासरी सोळाशे कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जागतिक मंदीच्या भीतीने आयटी क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची डिमांड वाढली होती. त्यामुळे कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोकरभरती केली होती. मात्र, आता हे अतिरिक्त मनुष्यबळ कंपन्यांसाठी अडचणीचे ठरू लागले आहे. त्यामुळे जगभरातील कंपन्या नोकरकपात करत आहेत.
सुमारे 91 कंपन्यांनी नवीन वर्ष सुरू झाल्यापासून 24 हजार कर्मचारी कपात केली आहे. येत्या काळात आणखी नोकर कपात होण्याची भीती आहे. 2022 वर्षात एक हजारांपेक्षा जास्त कंपन्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. नुकतेच शेअरचॅट या गुगलने गुंतवणूक केलेल्या कंपनीने 20 टक्के नोकरकपात करण्याची घोषणा केली असून दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीने सहाशे कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
भारतातील ऑनलाइन किराणा डिलिव्हरी कंपनी डंझोने 3 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनने 18 हजार कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून भारतातील 1 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.