तुमची मुलं जर टीन एजर्स असतील तर तुम्हाला त्यांना दर महिन्याला द्यावा लागणारा पॉकेट मनी आणि त्यांचे काही अवास्तव हट्ट नक्कीच माहित असतील.     
अनेकदा आपल्या मुलांना नातेवाईक किंवा घरी येणारी मित्रमंडळी किंवा पाहुणे खाऊसाठी पैसे देतात. ते पैसे छोट्या पिगी बँकेत टाकण्यापासून त्याची बचत व्हायला सुरुवात होते. पण त्यानंतर मात्र ती शिस्त आपण सुरू ठेवू शकत नाही. पैसे कसे वापरावेत याचे मूलभूत शिक्षण देत नाही. त्यामुळे पैसे व्यवस्थापन म्हणजेच मनी मॅनेजमेंट स्कील त्यांच्यात उतरत नाही. मग कालांतराने या सवयीमुळे वाढत्या वयानुसार त्यांचे अधिकाधिक आर्थिक नुकसान होते. आर्थिक शिस्त अंगी येण्यास खूप वेळ आणि मेहनत लागते.      
आपल्या मुलांना शिकवण्याची पहिली गोष्ट म्हणजे पैशांची किंमत. त्यांना हे समजले पाहिजे की, पैसे मिळविण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ते एटीएममधून आपल्या इच्छेने बाहेर पडत नाहीत. याचा अर्थ असा की पैसे मिळवताना काय कष्ट पडतात ह्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. विविध लोक पैसे कमावण्यासाठी काय काय करतात हे त्यांना दाखवून पैशाची किंमत त्यांना समजावून सांगितली पाहिजे. यासाठी मुलांना संवेदनशील बनवण्याची गरज आहे.
एकदा आपल्या मुलांना पैसे आणि त्यामागची संकल्पना समजली की, त्यांना आपल्या घराचं किंवा जमा-खर्चाचे बजेट तसेच ठरवून बचत (Savings) कशी करायची. गरजे पुरत्या गोष्टींचा वापर अशा संकल्पना त्यांच्यात रुजवणे महत्त्वाचे आहे. बजेटमुळे त्यांना त्या विशिष्ट कालावधीत खरेदी किंवा बचत करायच्या असलेल्या गोष्टी आणि त्या कालावधीत त्यांनी काय कमावले पाहिजे हे समजू शकेल. याचे आपण एक उदाहरण पाहुया. जसे की, मुले जेव्हा एखाद्या खेळण्याची मागणी करतात तेव्हा त्यांना सांगा की तिला किंवा त्याला त्यातील थोडेसे पैसे द्यावे लागतील. हफ्त्याप्रमाणे ते थोडी थोडी रक्कम देवू शकतात आणि मग उर्वरित रक्कम भरून तुमच्याकडून खेळणी घेऊ शकतात. त्यांना छोट्या छोट्या कामाद्वारे थोडे पैसे देऊन बचत करण्यास सुरुवात करून द्या. ही बचत त्यांच्या पिगी बँक किंवा पॉकेटमनीचा भाग असू शकते. मोठ्या मुलांसाठी त्यांना पॉकेटमनी किंवा त्यांनी केलेल्या कामांसाठी पैसे द्या. हे त्यांना पिग्गी बँक/बचत खात्यात त्वरित लहान रक्कम बाजूला ठेवण्यास प्रोत्साहित करेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मोठ्या मुलांना त्यांच्या सुट्ट्यांमध्ये आर्थिक व्यवहार करू द्या. त्यांना विविध वस्तूंसाठी पैसे देऊ द्या. बिले घ्यायला शिकवा आणि खर्च आणि शिल्लक यांचा हिशोब ठेवायला लावा.
पिग्गी बँकेत पुरेसा पैसा आल्यावर, बँकेत पैसे ठेवल्यावर त्याचे काय होते ते त्यांना दाखवा (पैसा कसा वाढतो). उदाहरणार्थ, पिगी बँकेत असलेले रु. 100 तेवढेच राहतात, तर 4% इंटरेस्ट म्हणजेच व्याज दर असलेल्या बँकेत तेच पैसे ठेवले तर 100 रूपयांवर 10 वर्षात अनुक्रमे रु. 148 आणि FD मध्ये 9% दराने रु. 237 पर्यंत वाढ होईल. मुलांना बँकेची स्टेटमेंट्स अभ्यासायला लावा, विशेषत: बँकेने दिलेल्या व्याजामुळे हा पैसा आता X रकमेवरून X + Y रकमेपर्यंत वाढला आहे, हे त्यांच्या लक्षात येईल आणि हे त्यांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहित करेल आणि त्यांना मिळणार्या आर्थिक भेटवस्तूंमधून अगदी लहान रक्कम देखील ते वाचवतील. मोठ्या मुलांना बचत बँकांबाहेरील गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी जमा केलेल्या बेसमधून अधिक पैसे कमविणे शक्य आहे. हे त्यांना समजावून दिले पाहिजे. आपल्या मुलांना ही संकल्पना समजावून सांगितल्याने हे सुनिश्चित होईल की तुमचे मूल कामाचे मोल समजून त्याप्रमाणे पैसे जपून वापरेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                            