भारतात लहान मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत असल्या तरीही अनेकदा त्यांच्यामध्ये आर्थिक व व्यावसायिक साक्षरतेचा अभाव पाहायला मिळतो. लहान मुलांना पैसा किती महत्त्वाचा आहे हे तर माहिती असते, पण त्या पैशाचा योग्य ठिकाणी खर्च करणे, बचत करणे याबाबत त्यांचे ज्ञान अपुरे असते.
लहान मुलांना आपण अनेक चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतो. पण ते आर्थिक साक्षर कसे होतील या कडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मुलं कमी वयातच आर्थिक साक्षर झाल्यास त्यांची निर्णय क्षमता वाढेल, बचतीची सवय लागेल व भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलांना कशाप्रकारे आर्थिक साक्षर बनवू शकता, त्याबाबत जाणून घेऊयात.
मुलांना आर्थिक साक्षर बनविण्यासाठी फॉलो करा या टिप्स:
कामाच्या मोबदल्यात द्या पैसे – तुम्ही मुलांना त्यांच्या खर्चासाठी दर आठवड्याला अथवा महिन्याला काही पैसे देत असाल. मात्र, मुलांना थेट पॉकेट मनी देण्याऐवजी तुम्ही त्यांना छोट्या मोठ्या कामाच्या मोबदल्यात पैसे दिल्यास त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. मुलांना पैशांसाठी काम करायला लागल्यास त्यांना त्याचे महत्त्व देखील समजेल. याशिवाय, मुलांचे वय 15 वर्षांपेक्षा जास्त असल्यास पार्ट टाईम काम करण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊ शकता. यामुळे मुलांना नवीन शिकायला मिळण्यासोबतच कामाची देखील सवय लागेल.
बचतीची सवय लावा– मुलांना दरमहिन्याला पॉकेट मनी देत असाल तर त्यातील काही पैसे हे गुंतवणूक म्हणून बाजूला काढून ठेवायची त्यांना सवय लावा. लहान मुलं प्रामुख्याने शालेय वस्तू व खाण्या-पिण्यासाठी पैसे खर्च करतात. त्यामुळे मुलांना अनावश्यक खर्च टाळण्यास सांगून बचतीची सवय लावू शकता. तुम्ही मुलांसाठी भविष्यात खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंसाठी गल्ला (Piggy Bank) बनवू शकता. शालेय वस्तू, कपडे, मोबाइल व इतर वस्तू खरेदी करायचे असल्यास वेगवेगळा गल्ला बनवून त्यात मुलांना पैसे जमा करण्यास सांगावे. यामुळे त्यांना गुंतवणुकीची देखील सवय लागते. मुलांचे बँक खाते उघडून, त्यात पैसे जमा करायला सांगू शकता.
खर्चाची नोंद करण्यास शिकवा – मुलांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची नोंद ठेवण्यास सांगितल्यास त्यांना पैशांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. याशिवाय, घरातील खर्चाची नोंद ठेवण्यासाठी देखील त्यांची मदत घेऊ शकता. यामुळे त्यांना विविध गोष्टींची माहिती देखील मिळते. यातून मुलं पैशांचे नियोजन कसे करावे, याचे कौशल्य शिकू शकतील.
बिल्स, विमा, बँकेबाबत माहिती द्या – तुमच्या लहान मुलांना लाईट बिल, मोबाइल-टीव्ही रिचार्ज, मेडिकल बिल्स, विमा इत्यांदीबाबत माहिती द्यावी. याशिवा यपेन्शन, म्युच्युअल फंड काय असते याबाबत समजून सांगावे. बँकेशी संबंधित काम असल्यास मुलांना सोबत घेऊन जावे व त्याबाबत त्यांना माहिती द्यावी. सुरुवातीला मुलांना या गोष्टी समजण्यास अवघड जाईल. मात्र हळूहळू या गोष्टी समजू लागतील व आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने टाकलेले हे सकारात्मक पाऊल असेल.