TCS Q4 Results: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने काल (बुधवार) चौथ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर केली. मंदीचे सावट असतानाही कंपनीने आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये नफा नोंदवला. Q3 च्या तुलनेत नफा 5% वाढला आहे. या निकालाचा शेअर बाजारावरही परिणाम झाला. नफ्याची आकडेवारी जाहीर करण्याबरोबरच कंपनीने प्रति शेअर लाभांशही देऊन शेअर होल्डर्सला खूश केले. (TCS share dividend) कंपनीने प्रति शेअर 24 रुपये डिव्हिडंड जाहीर केला.
Table of contents [Show]
चौथ्या तिमाहीतील नफा किती?
चौथ्या तिमाहिती टीसीएसने 11,392 कोटीं रुपये नफा कमावला. काही वृत्तसंस्थांनी जनमत चाचणी घेतली होती. त्यात टीसीएसचा नफा 11,562 कोटी रुपये होईल, असे म्हटले होते. मात्र, या अंदजापेक्षा कमी नफा नोंदवला. टीसीएस कंपनीने मागील आर्थिक वर्षात (2022-23) एकूण 107 रुपये प्रति शेअर लाभांश समभागधारकांना दिला. शेअरमार्केट नियामक संस्थेकडे सादर केलेल्या अहवालात टीसीएसने ही माहिती दिली. तसेच टीसीएसचा Q4 मधील एकूण महसूल 59,162 कोटी रुपये राहीला. Q3 पेक्षा 1.6 टक्क्यांची वाढ महसूलात झाली.
मागील पंधरा दिवसांपासून आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इन्फोसिस कंपनीने अद्याप तिमाही आकडेवारी जाहीर केली नाही. सोबत इतरही बड्या आयटी कंपन्या एप्रिल महिन्यात तिमाही आकडेवारीचा (जानेवारी-मार्च) लेखाजोखा मांडतील. जागतिक स्तरावर मंदीचे सावट असून युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांचा नफा रोडावला आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात आणि इतर उपाय शोधले जात असताना टीसीएसची (TCS profit) कामगिरी गुंतवणुकदारांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली.
राजेश गोपीनाथन यांच्या कार्यकाळातील शेवटचा निकाल
राजेश गोपीनाथन (CEO Of TCS Rajesh Gopinathan) यांनी 2017 साली टीसीएस कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदाची धुरा सांभाळली होती. मात्र, आता ते या पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. 2023 आर्थिक वर्षातील त्यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा तिमाही निकाल ठरला. सहा वर्षांच्या कार्यकाळात गोपीनाथन यांनी टीसीएसला नव्या उंचीवर नेले. आता त्यांच्या जागी के. किर्थीवासन यांची सीईओ म्हणून नियुक्ती होणार आहे.
टीसीएस कंपनीने मुख्य ग्राहक कोण?
टीसीएसचे जगभरात कार्यालये असून भारतातीलही अनेक सरकारी प्रकल्प कंपनीकडे आहेत. सोबतच विमा, बँकिंग, वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्या कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. अमेरिकेतील बलाढ्य मेटलाइफ या इन्शुरन्स कंपनीचे कामही टीसीएसकडे आहे. सॉफ्टवेअर प्रणाली आणि इतर तांत्रिक सेवा टीसीएस ग्राहकांना पुरवते. चौथ्या तिमाहीती टीसीएस कंपनीला 1000 कोटी डॉलरची कंत्राटे मिळाली. कंपनीने निश्चित आकडेवारी जाहीर केली नाही. FY23 मध्ये एकूण 3 हजार 400 कोटी डॉलरची एकूण कंत्राटे कंपनीला मिळाली.
कोणत्या विभागातून सर्वाधिक नफा?
टीसीएसच्या युनाइटेड किंग्डम कार्यालयातून सर्वाधिक म्हणजेच 17% नफा मिळाला. त्या खालोखाल उत्तर अमेरिका विभागातून 9.6% नफा मिळाला. तर कॉन्टिनेंटल युरोप विभागातील कार्यालयांतून 8.4% व्यवसाय वाढ झाली. लॅटिन अमेरिका 15.1%, भारतातून 13.4%, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतून 11.3% आणि एशिया पॅसिफिक विभागातून 7.5% नफा मिळाला.