भारतातील iphone निर्मिती प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या मार्चपर्यंत हा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील बलाढ्य मोबाईल कंपनी अॅपल मोबाईल निर्मितीचे काम दुसऱ्या कंपन्यांकडे असते. यामध्ये विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन ह्या Iphone निर्मितीतील महत्त्वाच्या कंपन्या आहेत. यातील कर्नाटकातील बंगळुरू शहरामध्ये असलेली विस्ट्रॉन कंपनी ताब्यात घेण्यासाठी टाटा कंपनीची बोलणी सुरू आहे.
विस्ट्रॉन ही तैवानची कंपनी असून अॅपल मोबाईलची निर्मिती करण्यामध्ये आघाडीची कंपनी आहे. जर टाटाने विस्ट्रॉन ही कंपनी ताब्यात घेतली तर पहिल्यांदाच एखादी भारतीय कंपनी अॅपल फोनचे उत्पादन करणारी ठरेल. कंपनी ताब्यात घेण्याचा व्यवहार कसा असावा यासाठी दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. यामध्ये कंपनीची जास्त मालकी टाटाकडेच राहू शकते, असे बोलले जात आहे. अॅपल मोबाईल उत्पादनातील महत्त्वाच्या प्रक्रिया टाटा कंपनीकडे राहतील यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी विस्ट्रॉन कंपनीची मदत घेण्यात येणार आहे.
टाटा कंपनीसोबतचा हा व्यवहार यशस्वी झाला तर चीनसाठी हा मोठा धक्का असेल. कारण, मागील काही वर्षांपासून अॅपल कंपनीच्या सर्व उत्पादनांची निर्मिती असेंबली चीनमध्ये होत होती. मात्र, कोरोना संकट आणि अमेरिका-चीनमधील बिघडलेले संबंध यामुळे कंपनीने हळुहळू चीनमधून गुंतवणूक काढून घेतली आहे. दरम्यान, भारत आणि चीनमधील संबंध सुद्धा ताणलेले आहे. सीमावादावरून भारत चीनमध्ये खदखद सुरू आहे. अशा परिस्थितीत आर्थिक आघाडीवर शह देण्याची कृती चिनी ड्रॅगनला चांगलीच झोंबू शकते.
बंगळुरू शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर विस्ट्रॉनचा निर्मिती प्रकल्प आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला तर टाटा कंपनी अॅपल आयफोन निर्मितीच्या कंपनीतील ८ लाईन्स ताब्यात घेईल. तसेच कंपनीतील 10 हजार कामगार सुद्धा टाटा कंपनीच्या कक्षेत येतील. विस्ट्रॉन कंपनी त्यानंतर सर्विस पार्टनर म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी अडीचेशे कोटी आयफोन भारतात तयार
अॅपल कंपनीने मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त 9 महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले. भारताच्या निर्मिती क्षेत्रासाठी ही मोठी बाब आहे.