Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीदारांची पसंती; सरकारचंही प्रोत्साहन

E Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीदारांची पसंती; सरकारचंही प्रोत्साहन

इलेक्ट्रीक वाहनांबाबतच्या (electric vehicle) घटना गेल्या काही दिवसात खूपच चर्चेत राहिल्या आहेत. त्यातील काही पॅझिटिव्ह तर काही निगेटिव्ह होत्या. पर्यावरणपूरक म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या वाहन प्रकारांसाठी खरेदीदारांची पसंती मात्र कायम राहिली आहे.

इलेक्ट्रीक वाहनांची (electric vehicle) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावरून, त्याच्या क्वालिटीवरून खूपच बोललं, लिहिलं जातंय. विशेषतः दोन चाकी इलेक्ट्रेलिक वाहनांबाबत देशातील काही भागात चुकीच्या घटना घडल्या. त्यामुळे या वाहनांचा वापर करणारे तसंच अशी वाहनं घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागली. असं असलं तरी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (financial year) इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढल्याचं स्पष्ट झालंय. सरकारी पातळीवरून या वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण कायम असलं तरी त्यासाठीच्या इन्फ्रास्ट्रक्चर (infrastructure) सुविधा निर्माण करण्याकरिता मोठी संधी उपलब्ध आहे.

सरकारच्या प्रोत्साहन योजनेमुळे भारतात इलेक्ट्रीक गाड्यांची खरेदी 2021-22 मध्ये मोठ्या संख्येने वाढली. देशात 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 30 टक्क्यांपर्यंत व्हावी, असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने, ग्राहक आणि वाहन उत्पादक या दोन्हींसाठी प्रोत्साहनाच्या योजना आणल्या जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगच्या (Electric vehicle charging stations) सुविधा देशभरात विस्तारतील तसा इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर देशभरात, विशेषतः ग्रामीण भागातही विस्तारत जाईल, अशी अपेक्षा आहे.

इनोव्हेशनला आणखी वाव

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत बॅटरी (battery) आणि चार्जिंग (charging)बद्दलची आव्हानं अजूनही आहेत. एका चर्जिंगमध्ये वाहनांची बॅटरी जास्तीत जास्त अंतरापर्यंत टिकावी यासाठी जगभरात संशोधनाला महत्त्व दिलं जात आहे. तसं झालं तर या वाहनांची रेंज वाढू शकेल आणि अधिक लांब पल्ल्याच्या अंतरासाठी इलेक्ट्रिक कार वापरण्याचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा आहे. हे तंत्रज्ञान नवं असल्याने त्यात इनोव्हेशनला (innovation) वाव आहे. त्यामुळे अनेक तरुण उद्योजक आणि स्टार्टअपदेखील (start-up) इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात नवीन योगदान देण्यासाठी कार्यरत आहेत.

ग्रीन नंबर प्लेट लक्षवेधी ठरतेय

इलेक्ट्रिक व्हेईकलची (Electric Vehicle) विक्री गेल्या वर्षभरात वाढताना दिसली. सध्या बाजारात ग्रीन नंबर प्लेट (इव्हीसाठीची) असलेली वाहनं लक्षवेधी ठरत आहेत. अनेक कार उत्पादकांनी आपल्या मॉडेलच्या श्रेणीत काही वाहनं विजेवर चालणारी असावी यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांची नवनवीन मॉडेल लॉंच करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे एक - दोन वर्षांत अजून अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येतील, अशी अपेक्षा आहे.

थ्री व्हीलर वाहनांची आघाडी

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रमाणानुसार खरी आघाडी ही थ्री व्हीलर गाड्यांनी घेतली आहे. भारतात थ्री व्हीलर व्हेईकल हे पॅसेंजर किंवा लगेजसाठी वापरली जातात. पेट्रोल – डिझेलचे भाव भरमसाठ वाढल्याने इलेक्ट्रिक थ्री व्हीलर गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  गेल्या वर्षी टु व्हीलरची विक्री वाढली होती. इलेक्ट्रिक वाहनांच्याबाबतीत यंग जनरेशनची उत्सुकता अजून कायम आहे. तसेच या गाड्यांच्या विक्रीसाठी प्रमोशनल स्कीम ही भरपूर आहेत. शहरातील बदलांनुसार कम्युटेशनसाठी (commutation) इलेक्ट्रिक टु व्हीलरचा वापर सध्या वाढतोय. तो नक्कीच उपयोगी ठरू शकतो. घरगुती इलेक्ट्रीक कनेक्शनवर चार्जिंग येत्या काळात आणखी वाढणार आहे.

व्यावसायिक वाहनं (Commercial Vehicle)

विविध व्यावसायिक कारणांनी फ्लीट व्हेईकल बाळगणाऱ्या इन्स्टिट्युशनल कस्टमरवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. हे एक संघटित (organized) क्षेत्र आहे. त्यामुळे मागणी आणि विक्रीपश्चात सेवा देणं सुलभ होतं. इलेक्ट्रिक वाहनांमुळे कॉस्ट सेव्ह होते आणि चार्जिंगसारख्या सुविधा एकाच ठिकाणी असल्याचा व्यावसायिक वाहनांना फायदा होतो. सार्वजनिक बस वाहतुकीसाठीच्या गाड्याही याच प्रकारात मोडतात. राज्यांच्या परिवहन सेवा मंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सिटी बस ट्रान्सपोर्ट सेवेने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आघाडी घेतली आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांतूनही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्याचा विचार सुरू आहे.

हा सगळा एवढा मोठा बदल का करायचा?

याबाबत महत्त्वाचं कारण पर्यावरणाशी (environment) संबंधित आहे. वातावरणीय बदलामुळे (global warming) जगापुढे मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. त्यावर मात करण्याची स्थानिक आणि जागतिक दोन्ही पातळ्यांवर गरज आहे. पेट्रोल - डिझेलसारख्या इंधनांमुळे होणारं प्रदुषण (pollution) टाळून स्वच्छ, हरित तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणं आवश्यक आहे. पर्यावरणामुळे जगात अनेक देशांत इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर जाणीवपूर्वक वाढवण्यात येत आहे.

भारताला आपल्या गरजेपुरतं पेट्रोल - डिझेल इतर देशांकडून आयात (import) करावं लागतं. त्याचा खर्च खूप मोठा आहे. शिवाय त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरही भार पडतो. इंधनासाठी स्थानिक आणि नवीन सोर्स मिळाले तर त्याचा स्वावलंबनाच्या दृष्टीने लाभ होऊ शकतो. कदाचित म्हणूनच भविष्यकाळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल, असं म्हटलं जातं.