Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buy Now Pay Later चा वापर करताना घ्या विशेष काळजी, वाचा या टिप्स

Buy Now Pay Later

'आधी खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ अशी ही सुविधा आहे, म्हणजेच ज्या कंपनीने तुम्हाला ही सुविधा देऊ केली आहे, त्या कंपनीला ठराविक वेळेत तुम्हांला पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही हे पैसे वेळेत भरले नाही तर तुम्हांला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. 'पे लेटर' ही सुविधा वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते समजून घेऊयात या लेखात...

‘आधी खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ या योजनेचा सध्या मार्केटमध्ये सुळसुळाट आहे. जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल तर तुम्हाला वेगवगेळ्या कंपन्या अशा ऑफर्स देताना हमखास आढळतील. एवढच नाही तर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम सारख्या नामांकित ई-कॉमर्स वेबसाईट देखील ग्राहकांना अशा सेवा देऊ लागल्या आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही जे काही व्यवहार करत असाल त्यात जर पारदर्शकता नसेल तर तुम्हांला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. Buy Now Pay Later सारख्या ऑफर्सचा लाभ घेण्याआधी काही गोष्टींची शहानिशा करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात की अशा पद्धतीच्या ऑफर्सचा लाभ घेण्यापूर्वी ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे.

तुमच्याकडे खरेदी करताना पैसे नाहीत, परंतु तुम्हांला ती वस्तू मात्र  खरेदी करायची आहे, अशावेळी या सुविधेचा फायदा तुम्हांला हमखास होईल यात शंका नाही. परंतु या योजनेचे जेवढे फायदे आहे तितकेच तोटे देखील आहेत हे लक्षात घ्या. ‘आधी खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ अशी ही सुविधा आहे, म्हणजेच ज्या कंपनीने तुम्हाला ही सुविधा देऊ केली आहे, त्या कंपनीला ठराविक वेळेत तुम्हांला पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही हे पैसे वेळेत भरले नाही तर तुम्हांला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. पे लेटर ही सुविधा वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते समजून घेऊयात.

होऊ शकतो दंड

तुम्ही Buy Now Pay Later ही सुविधा जेव्हा घेता तेव्हा कंपनीचे काही नियम व अटी तुम्हांला मान्य कराव्या लागतात. त्यानुसारच तुम्हाला या योजनेचा फायदा दिला जातो. त्यामुळे ठराविक दिवसांत जर तुम्ही बिलाची रक्कम कंपनीला अदा केली नाही तर तुमच्याकडून कंपनी दंड आकारू शकते.पैसे भरण्यास तुम्ही जितका विलंब कराल तितकी दंडाची रक्कम वाढत जाते हे लक्षात असू द्या. प्रत्येक कंपनीची दंडाची रक्कम वेगवेगळी असते. त्यामुळे ही सुविधा घेताना कंपनीच्या नियम व अटी बारकाईने तपासून घ्या. जर नमूद केलेल्या वेळेत तुम्ही पैसे भरण्यास असमर्थ असाल तर या सुविधेचा लाभ न घेतलेलाच बरा.

क्रेडिट स्कोअर होईल खराब

Buy Now Pay Late मध्ये जर  बिल भरण्यास विलंब झाल्यास मोठा दंड भरावा लागतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.परंतु आर्थिक दंडासोबतच तुम्हांला इतर अडचणींचा देखील सामना करावा लागेल हे लक्षात असू द्या. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्ही वेळेत बिल न भरल्यास तुमचा स्कोअर कमी होतो आणि भविष्यात तुम्हांला कर्ज मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आर्थिक शिस्तीचा अहवाल वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था क्रेडिट ब्युरोला पाठवत असतात. याच आधारे तुमचा क्रेडिट स्कोअर बनवला जातो. त्यामुळे वेळेत बिल भरणे कधीही चांगले.अशाप्रकारच्या योजनांमध्ये खरेदी करताना दीर्घकालीन विचार जरूर करा.

अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळाच!

अनेक वेळा तुम्हाला पे लेटर अकाउंटद्वारे ऑनलाइन शॉपिंगसाठी पैसे भरण्यासाठी सूट आणि कॅशबॅक ऑफर दिल्या जातात. त्यातून खरेदी करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करता. अशा प्रकारे ही तुमची सवय बनते आणि ऑनलाइन शॉपिंगवर तुमचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशाच गोष्टी खरेदी करा. त्यामुळे पैसे तर वाचतीलच पण बचतीची देखील सवय लागेल.