फॉक्सकॉन (Foxconn) आता तामिळनाडू राज्यात आपला इलेक्ट्रॉनिक घटकांची (Electronic component) निर्मिती करणारा प्रकल्प उभारणार आहे. मूळ तैवानची कंपनी असलेली फॉक्सकॉन चर्चेत आहे, ती वेदांतासोबत फिस्कटलेल्या व्यावसायिक करारामुळे... वेदांतासोबत (Vedanta) आता डील झालेली नसली तरी भारतात मात्र कंपनी भलामोठा प्रकल्प सुरू करणार आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीनं केली आहे. 1600 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मोबाइल कंपोनन्ट याठिकाणी तयार केले जाणार आहेत. सहाजिकच या माध्यमातून रोजगारनिर्मितीदेखील होणार आहे. जवळपास 6000 किंवा त्याहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.
राज्य सरकारसोबत चर्चा
फॉक्सकॉननं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यासंदर्भात उद्योगमंत्री डॉ. टी. आर. बी. राजा यांनी माहिती दिली आहे. चेन्नईजवळ असणाऱ्या कांचीपुरम याठिकाणी फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारला जाणार आहे.
? Big news and a proud moment for #TamilNadu!
— Minister for Industries, GoTN, India (@TNIndMin) July 31, 2023
Today, in the presence of Hon’ble @CMOTamilnadu Thiru @MKStalin avargal, M/s. Hon Hai Technology Group (#FOXCONN) signed a Letter of Intent with @Guidance_TN to set up a new mobile components manufacturing facility at a cost of Rs.… pic.twitter.com/eIf0QyIbi7
पुढच्या वर्षी सुरू होणार प्रकल्प
आधीही फॉक्सकॉननं तामिळनाडूत गुंतवणूक केली होती. त्यांच्या आयफोन असेंब्ली प्लान्टपेक्षा हा प्रकल्प वेगळा असणार आहे. त्या प्रकल्पाद्वारे जवळपास 35,000 लोकांना रोजगार मिळाला. आता नव्या प्रकल्पातून आणखी 6000च्या आसपास रोजगार उपलब्ध होईल. दरम्यान, पुढच्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य
वेदांता कंपनीसोबत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करणार होता. त्यासाठी आधी महाराष्ट्र आणि नंतर गुजरातमध्ये प्रकल्पाची बोलणीही सुरू होती. मागच्या वर्षी गुजरात सरकारबरोबर 1.54 लाख कोटींचा करारही करण्यात आला होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून सेमीकंडक्टर चिप तसंच डिस्प्ले प्रॉडक्शन केलं जाणार होतं. मात्र ही सर्व बोलणी फिस्कटली. त्यानंतर फॉक्सकॉन भारतातून काढता पाय घेणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र आपली भारतातली गुंतवणूक सुरूच राहणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.