भारताला सेमीकंडक्टर हब (Semiconductor hub) बनवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वेदांता ग्रुपनं फॉक्सकॉनसोबत (Foxconn) मायक्रो चिप बनवण्यासाठी भागीदारी केली. यासंबंधीचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. मात्र काही राजकीय कारणास्तव तो गुजरातला हलवण्यात आला. त्यानंतर वेदांताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात फॉक्सकॉननं साथ सोडली. मात्र अशाही परिस्थितीत मायक्रो चिपचा प्रकल्प होणार असल्याचं अनिल अग्रवाल (Anil Agrawal) यांनी सांगितलं. त्यानुसार आता नवा भागीदारही त्यांनी शोधला आहे. गुजरातमधल्या धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रात नवा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
तीन कंपन्यांशी बोलणी
अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वेदांता तीन कंपन्यांशी सेमीकंडक्टरच्या उत्पादनासंदर्भात बोलणी करत आहे. फाउंड्री, चीप्स आणि पॅकेजिंग तसंच चाचणीसंदर्भात ही बोलणी सुरू आहे. वेदांता सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅबच्या मॅन्यूफॅक्चरिंगसाठी प्रयत्नशील आहे. मात्र तैवानच्या फॉक्सकॉननं मागे त्यांची साथ सोडली. त्यांच्यात 19.5 अब्ज डॉलरचा करारही मागच्या वर्षी झाला होता. आता दोन्ही कंपन्यांमधला हा करार रद्द झाला आहे. चीप निर्माण करणारी अमेरिकन कंपनी अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेसनं पुढच्या 5 वर्षांत भारतात जवळपास 400 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे.
Gujarat is the right place for creating Silicon Valley of India: Shri Anil Agarwal, Chairman, Vedanta Group.#SemiconIndia2023 #IndiaTecade pic.twitter.com/oJN130D2Xt
— Gujarat Information (@InfoGujarat) July 28, 2023
सेमिकॉन इंडियाच्या कार्यक्रमात अनिल अग्रवाल सहभागी
आपल्या आगामी प्रकल्पासंदर्भात अनिल अग्रवाल म्हणाले, की जपान, कोरिया तसंच अमेरिकेत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या गुजरातमध्ये इकोसिस्टम तयार केली जाणार आहे. याचसाठी 100 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मायक्रो चिपच्या प्रकल्पासाठी नव्या 3 कंपन्यांसोबत आमची बोलणी सुरू आहे, अशी माहिती सेमिकॉन इंडिया 2023च्या (Semicon India 2023) उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी दिली. गुजरातच्या गांधीनगरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 30 जुलैपर्यंत का कार्यक्रम चालणार आहे.