Wedding Shopping: सस्टेनेबल फॅशन या ट्रेंडबद्दल संपूर्ण जगात चर्चा होत आहे, जगभरातील अनेक सेलिब्रेटी याविषयी बोलत आहेत. हा ट्रेंड प्रामुख्याने फ्रान्स, अमेरिका आणि काही अंशी युरोपीय देशात फॉलो केला जात आहे. या ट्रेंडविषयी आलिया, करिनापासून ते ईशा अंबानीपर्यंत अनेकजण बोलले आहेत. मात्र भारतीयांनी या ट्रेंडकडे पाठ फिरवली. हा ट्रेंड एरव्ही फॉलो होत नसला किंवा भारतीयांना या ट्रेंडमध्ये काहीच नावीन्य वाटले नसले, तरी लग्नसराईच्या खरेदीत हा ट्रेंड जोरात सुरू आहे.
सस्टेनेबल फॅशन काय आहे? (What is sustainable fashion?)
सस्टेनेबल फॅशन म्हणजे थोडक्यात फॅशन बदलते, ट्रेंड बदलतो तसे आपण नवे कपडे घेत राहतो आणि आधीचे कपडे पडून राहतात यामुळे पृथ्वीवर कपड्यांचा कचरा वाढण्यास भर पडते. आताचे कपडे हे बहुतांशी सिंथेटीक धाग्यांपासून, केमिकलच्या साहाय्याने बनवलेले असतात. अशावेळी या कपड्यांच्या कचऱ्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला चालना दिल्यासारखे होते. यामुळे सस्टेनेबल फॅशन ही कन्सेप्टची ओळख करून देण्यात आली, हा एक प्रकारचा सामाजिक उपक्रमच मानला जातो. फॅशन जगाशी जोडलेल्या कलाकारांनी यात सहभाग घेतला ज्यामुळे हा ट्रेंड सुरू झाला. यासह सुती, हँडलुम कपडे त्यासह चांगला जमिनीचा पोत असलेल्या ठिकाणी कापसाची शेती करून त्याद्वारे बनलेल्या धाग्यापासून कापडनिर्मिती आणि त्या कापडाचे ड्रेसेस हा देखील त्यातला एक भाग आहे, मात्र याची काही ट्रेंड किंवा चर्चा होताना दिसत नाही. फक्त कपडे रिपीट करणे, ते एक - दोन वेळा वापरुन टाकून न देणे एवढाच भाग सेलिब्रेटींमार्फत सांगण्यात येतो.
भारतात मुळात, कपडे असो किंवा आणखी त्याचा वापर अगदी पुरेपुर केला जातो.जे पैसे त्या वस्तूसाठी खर्च केले आहेत, ते पूर्ण वसूल केल्याशिवाय टाकून देत नाही. त्यामुळेच हा ट्रेंड भारतात काही विशेष चालला नाही. मात्र लग्नातील शालू, लेहेंगा हे असे कपडे आहेत जे इतके भरजरी, जड असतात की ते पुन्हा कधी वापरून होतच नाही. मात्र आता सस्टेनेबल वेडिंग ड्रेस हा प्रकार नागरिकांमध्ये रुळताना दिसत आहे.
लग्नसराईतील सस्टेनेबल फॅशन (Sustainable fashion in weddings)
ऑरगॅन्झा, नेट, सॅटीन, ब्रॉकेड आदींमधील लेहंगे, इंडियन गाऊन हे वजनाला हलके असतात, पण दिसताना नवरीच्या ड्रेसप्रमाणे दिसतात, असे ड्रेस घेण्याकडे नव्या नवरीचा कल असल्याचे दिसून येते. शालू हा खास नवरीसाठी साडीचा प्रकार असतो. शालूमध्ये मुख्यत्त्वे बनारसी साडी असते. मात्र आता जॉर्जेट आणि शिफॉनमध्येही एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या साड्या मिळतात. मात्र आजकाल साधारण 8 टक्के मुली लग्नासाठी सा़डीला प्राधान्य देतात, बाकी 92 टक्के मुली लेहंगा, इंडियान गाऊन ड्रेसला प्राधान्य देताना दिसतात. तर लग्नाच्या विधींसाठी कॉटन - सिल्क साड्या घेण्याकडे नव्या नवरीचा आणि तिच्या नातेवाईकांचा कल दिसून आला आहे, असे साडी डिलर किशनलाल मेहता यांनी सांगितले. कॉटन-सिल्कमुळेसाडीचे वजन कमी होते, साडी कॅरी करणे सोप्पे जाते. आजकाल सर्वच लग्नांमध्ये नृत्याविष्कार सादर केले जातात, अशावेळी वजनाला हलके असलेले, कम्फर्टेबल कपडे घालणे आवश्यक असते, जेणेकरून डान्स व्यवस्थित व्हावा. त्यातही अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये किंवा साड्यांमध्ये विविध रंग उपलब्ध झाले आहेत. सध्या पेस्टल कलर निवडण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. त्यातही सध्या लव्हेंटर रंग ट्रेंडमध्ये आहे. हा रंग इयर ऑफ द कलर आहे.
सध्या एकूणच वजनाला हलके असलेले कपडे घेण्याकडे कल आहे. जेणेकरून ते कपडे लग्नात व्यवस्थित कॅरी करता येतात आणि नंतर इतर फंक्शनला ते वापरताही येतात. ऑरगॅन्झा, नेट, सॅटीन, ब्रॉकेड, कॉटन-सिल्क आदी कापडाचे कपडे स्वस्तही असतात, यामुळे बचतही होते आणि लुकही सुंदर होतो. इंडियन ड्रेस साधारण 3 हजारांपासून सुरू होतोत ते अगदी 25 हजारांपर्यंत, तर लेहंगा 5 हजारांपासून सुरू होतात 40 हजारांपर्यंत मिळतात. इतर लेहंगे 12 लाखांपर्यंतही मिळतात, मात्र ते वजनाला जड आणि या कापडांमध्ये मिळत नाहीत. तर कॉटन सिल्कच्या साड्या साधारण 4 हजारांपासून सुरू होतात, या किंमती मुंबईतील दादर पूर्व दुकानांमध्ये दिसून आलेल्या आहेत.
फॅशन डिझाइनर अनिता डोंगरे यांनीही मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, त्यांच्याकडे येणाऱ्या मुली या लाल, हिरवा, पिवळा पेक्षा वेगळे रंग निवडत आहेत, हलक्या डिझाइन्स, वजनाला हलके कपडे निवडतात, पुन्हा वापरू शकतो या विचाराने कपडे निवडत आहेत. तर, मिंत्रा इन्साईडर इन्फ्लुएन्सर पूर्वी शिंगटे म्हणाल्या की, भारतीय लग्नात खूप पैसे खर्च करतात. महागडे कपडे घेतात, मात्र ते पुन्हा कधीच वापरता येत नाहीत, ते कपाटात पडून राहतात, ते कोणाला देऊही शकत नाहीत. त्यामुळे आणि सध्या आलेल्या मिनिमलिस्टीक फॅशन तसेच सस्टेनेबल फॅशनच्या ट्रेंडमुळे, अशाप्रकारचे कपडे घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळाले आहे.