Fake Medicines: सन फार्मा कंपनीच्या एका तक्रारीमुळे बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने 2 कोटी रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहे. (Fake Medicines seize from Kolkata) देशातील प्रमुख शहरांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कोणत्या कंपन्यांची बनावट औषधे
सन फार्मा, अल्केम, सिप्ला, जीएसके, अॅबॉट, ग्लेनमार्क, नोव्हार्टिस, डॉ. रेड्डी आणि अॅरिस्टो अशा मोठ्या कंपन्यांची बनावट औषधे तपास यंत्रणांना कोलकाता शहरातील गोदामात आढळून आली. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशासह इतर राज्यामध्ये या बनावट औषधांचा पुरवठा होत होता. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विविध राज्यात धाडी टाकून संबंधित व्यक्तींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या कॉल रेकॉर्डिंगमुळे गोदाम नक्की कोठे आहे हे समजू शकले.
बनावट औषधांची ब्रँडेड पॅकेजिंग
जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये सर्वाधिक औषधे ही अँटिबायोटिक, अँटायसिड्स, हृदयरोग आणि गरोदरपणाच्या काळात घ्यावयाची होती. (Fake Medicines seize from Kolkata) या सर्व औषधांच्या पाकिटावर ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावले होते. तसेच पॅकेजिंगही हुबेहूब होते. कोलकात्यातील अली रोड येथील गोदामातून ही सर्व औषधे जप्त करण्यात आली. भारतातील कोणकोणत्या राज्यात औषधांचा याआधी पुरवठा करण्यात आला, याचा तपास यंत्रणा घेत आहेत.
विविध राज्यात छापे
या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी तपास यंत्रणांनी हैदराबाद शहर, उत्तराखंड, सिक्कीम आणि बिहार राज्यात छापे मारले. औषध प्रशासनाने या घटनेनंतर सर्व कंपन्यांना सतर्क केले आहे. मार्केटिंग विभागाला बाजारातील बनावट पॅकेजिंगवर लक्ष ठेवायला लावले आहे. संशय आल्यास त्वरित कंपनीला माहिती पुरवण्यास सांगण्यात आले आहे.