केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या मालाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि साखरेची वाढती किंमत रोखण्यासाठी 1 जूनपासून साखर निर्यातीवर बंदी (sugar export ban in india) घातली आहे. "1 जून, 2022 पासून साखरेची (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) निर्यात प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आली आहे," असे विदेशी व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे जारी केले आहे. दरम्यान, सीएक्सएल (CXL) आणि टीआरक्यू (Tariff Rate Quota-TRQ) अंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेमध्ये (European Union and US) निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू नाहीत. या देशांना सीएक्सएल (CXL) आणि टीआरक्यू (TRQ) अंतर्गत विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात केली जाते. सरकारने 2021-22 मध्ये ऑक्टोबर-सप्टेंबरच्या साखर हंगामात देशांतर्गत साखरेची मुबलक प्रमाणात उपलब्धता असावी आणि साखरेची किंमत ही स्थिर राहावी, यासाठी 1 जूनपासून साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक आणि साखर निर्यात करणारा देश आहे. भारत जगात साखर निर्यात करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये, भारत जगातला सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश ठरला होता. भारताने 2020 मध्ये 53.9 लाख टन साखर निर्यात केली होती. 2019 आणि 2018 मध्ये अनुक्रमे 38 आणि 24.1 लाख टन साखर निर्यात केली होती. गेल्या काही वर्षात भारत हा ब्राझील, थायलंड आणि फ्रान्स या साखर निर्यातदार देशांच्या पंक्तीत आहे.
साखर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
केंद्र सरकारच्या साखर निर्यातबंदीच्या निर्णयामुळे मागील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अवध शुगर अॅण्ड एनर्जी, धामपूर शुगर्स, बलरामपूर चिनी यांचे शेअर्स गेल्या आठवड्यात 10 ते 15 टक्क्यांनी घसरले होते. तसेच रेणुका शुगर्स, बजाज हिंदुस्थान आणि ईआयडी पॅरीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. पण येणाऱ्या दिवसांमध्ये या कंपन्यांच्या शेअर्समध्ये (sugar stocks to buy in 2022) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येण्याची शक्यता आहे.
गरजेपेक्षा 160 लाख टन साखर अधिक
यावर्षी साखर उद्योगाचा 350 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. तर देशातील साखरेचा खप 272 लाख टन असल्याचे सांगितले जात आहे. त्यात गेल्या वर्षीतील सुमारे 82 लाख टन साखरेचा साठा शिल्लक असल्याने, यावर्षी एकूण 432 लाख टन साखरेचा साठा असणार आहे. म्हणजेच गरजेपेक्षा 160 लाख टन साखरेचा साठा अधिक आहे.
या सर्व घडामोडीत साखर उद्योगासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून इथेनॉल निर्मितीसाठी दिला जाणारा सपोर्ट. यामुळे डिस्टिलरी व्यवसायाचीही मागणी वाढली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत साखरेच्या साठ्यात वाढ झाली असली तरी साखरेच्या शेअर्समध्ये इतकी घसरण झाली नव्हती. त्यामुळे सध्या साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी (sugar stocks to buy now) ही संधी ठरत आहे.
या तीन कंपन्या ठरू शकता फायदेशीर!
बनारी अम्मान, बलरामपूर चिनी आणि मगध शुगर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं, असं शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मगध शुगर्स कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च 455 रुपयांवरून 308 रुपयांपर्यंत खाली आला होता. या कंपनीने 2022 या वर्षात प्रति शेअर्सने (Earnings per share-EPS) 32.66 रूपयांची कमाई केली होती. तर बलरामपूर चिनी मिल्स कंपनीने 2022 मध्ये 25 रूपयांचा ईपीएस (EPS) नोंदवला होता. धामपूर शुगर मिल्सचे शेअर्सही 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले होते.
एकूणच, साखरेच्या वाढत्या किमती आणि इथेनॉलच्या वाढीमुळे साखरेच्या साठ्याच्या किमती घसरल्याने साखर कंपन्यांच्या शेअर्सची मागणी वाढण्याची शक्यता आहे.