भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक आणि साखर निर्यात करणारा देश आहे. देशात उत्पादित होणाऱ्या साखरेतील बराचसा भाग हा देशांतील गरज भागवण्यासाठी वापरला जातो. तरीही भारत जगात साखर निर्यात करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये भारताने 53.9 लाख टन साखर निर्यात करून पहिला क्रमांक पटकावला होता. साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा केंद्राचा निर्णय म्हणजे दिवसेंदिवस अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण यामुळे जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
भारत साखर उत्पादनात अव्वल
जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश म्हणून ब्राझील आणि भारत यांच्यात टशन सुरू आहे. पण गेल्या 5 वर्षांतील या दोन्ही देशांचा डेटा पाहिला असता 2015 ते 2019 या 5 वर्षांच्या कालावधील 2018 आणि 2019 मध्ये भारत साखर उत्पादनात अव्वल होता. तर अगोदरच्या 3 वर्षात ब्राझील पहिल्या क्रमांकावर होता. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन 355 लाख टन होते. त्यातील अंदाजित 100 लाख टन साखर 2021-22 मध्ये निर्यात केली जाणार आहे.
निर्यातदारांमध्येही भारत क्रमांक 1 वर
2020 मध्ये, भारत जगातला सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश ठरला होता. भारताने 2020 मध्ये 53.9 लाख टन साखर निर्यात केली होती. 2019 आणि 2018 मध्ये अनुक्रमे 38 आणि 24.1 लाख टन साखर निर्यात केली होती. गेल्या काही वर्षात भारत हा ब्राझील, थायलंड आणि फ्रान्स या साखर निर्यातदार देशांच्या पंक्तीत आहे.
चीन, अमेरिका हे देश सर्वांत मोठे आयातकर्ते
चीन आणि अमेरिका हे साखर उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणारे देश, साखर आयात करण्याच्या क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर आहेत. सर्वाधिक साखर आयात करणाऱ्या देशांमध्ये लहान-मोठे देश आहेत. जसे की सुदान, 2020 मध्ये हा देश साखर आयात करण्याच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. सुदाने 14.6 लाख टन साखर आयात केली होती. तर 2019 आणि 2018 मध्ये इटली देशाने अनुक्रमे 14.5 आणि 13.8 लाख टन साखर आयात केली होती.
भारत साखरेचा अव्वल ग्राहकही!
2020-21 मध्ये युरोपियन युनियनमधील 28 सदस्य देश आणि चीन यांनी या देशांनी जेवढी साखर वापरली, तेवढी साखर एकट्या भारताने वापरली आहे. 2020-21 मध्ये एकट्या भारताने 280 लाख टन साखर फस्त केली. तर युरोपियन युनियनने 166 लाख टन, चीनने 155 लाख टन आणि अमेरिकेने 110 लाख टन वापरली.