देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून ही बंदी लागू केली जाणार आहे. त्यामुळे तेलाबरोबरच आता साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे दर ही वाढत होते. या वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून ही बंदी लागू होणार आहे. गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच साखरेच्या निर्यातीवर अशी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, 2021-22 या वर्षातील साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, 24 मे रोजी देशांतर्गत बाजारात साखरेची सरासरी किंमत 41.55 रूपये प्रति किलो होती. तर कमाल किंमत 51 रुपये आणि किमान किंमत 36 रुपये प्रति किलो आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी गहू आणि गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. आता सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावत आहे.
साखर निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारत हा ब्राझीलच्या पाठोपाठ जगातील सर्वात मोठा दुसरा साखर उत्पादक देश आहे. भारताने ऑक्टोबर, 2021 ते एप्रिल 2022 या दरम्यान 71 लाख टन साखर निर्यात केली. तर मे महिन्यात 8 ते 10 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. 2021-2022 या वर्षात एकूण 90 लाख टन साखर निर्यात होण्याची अपेक्षा केली जात आहे. त्याच्या अगोदर 72 लाख टन साखर निर्यात केली गेली होती.