Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महागाईने त्रस्त झाला आहात? 'या' टीप्सने होऊ शकते तुमची बचत!

Saving Tips for Inflation

वाढत्या महागाईने प्रत्येकजण त्रस्त आहे. या महागाईमुळे अनेक जणांना नोकरीसुद्धा गमवावी लागली आहे. नेमक्या याच काळात वर्षानुवर्षे केलेली बचत कमी होत जाते. अशावेळी महागाईचा सामना कसा करायचा? याच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जगभरात महागाईचा दर झपाट्याने वाढत आहे. महागाई वाढली की, आरबीआय रेपो दरात वाढ करते. परिणामी बॅंका कर्जांवरील व्याजदरात वाढ करतात. यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तुंची किंमतही झपाट्याने वाढते. वाढत्या महागाईमुळे घरातील खर्चाचा मेळ घालणे अवघड होते. त्यात केलेली गुंतवणूक ही कमी होऊ लागते. त्यामुळे वाढत्या खर्चावर मर्यादा आणून बचतीच्या विविध पर्यायांचा वापर केला पाहिजे. तर हे बचतीचे विविध पर्याय काय असू शकतील, ते आपण पाहुयात.

बचतीचे बजेट तयार करा

बऱ्याचवेळा तुमच्याकडे पैसे असतात म्हणून तुम्ही खर्च करत राहता. पण नंतर अशी वेळ येते की, बचत करण्यासाठी पैसेच उरत नाही. यासाठी बचतीचे नियोजन किंवा त्याची अगाऊ योजना फायदेशीर ठरू शकते. तसेच यासाठी तुम्ही किती आणि कशी बचत करता हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाने किती बचत करायची? हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. कारण तुमची एकूण मिळकत किती आहे. तुमचे खर्च किती आहेत. तुमच्या बचतीची उद्दिष्टे काय आहेत. यावर बचतीचे प्रमाण ठरते. यासाठी तुम्ही जर एक सूत्र स्वत:ला लावून घेतले तर तुमची बचत शिस्तबद्ध होईल. जसे की, 50/30/20 चा नियम. या नियमाप्रमाणे, तुम्ही जर तुमच्या उत्पन्नातील 50 टक्के पैसे गरजा पूर्ण करण्यासाठी, 30 टक्के इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि 20 टक्के बचतीसाठी ठेऊ शकता. एकूण मिळकतीतील 20 टक्के रक्कम बचतीसाठी बाजुला काढून ठेवणे हा काही जणांना अवघड वाटू लागेल. पण यासाठी खर्चावर नियंत्रण आणून अशा पद्धतीने बचत नक्कीच करता येईल.

खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा 

तुम्हाला जर ठराविक महिन्याला बचत करायचीच असेल तर, त्यासाठी एकूण उत्पन्नातील काही रक्कम बाजुला काढून ठेवावी लागेल आणि मग उरलेल्या रकमेतून खर्चाचा मेळ बसवावा लागेल. आता खर्च करण्यासाठी तुम्हाला त्याचा क्रमसुद्धा ठरवावा लागेल. कोणत्या गोष्टींवर खर्च केलाच पाहिजे किंवा एखाद्या ठिकाणी खर्च कमी करून तो इतर गोष्टींसाठी वापरता येईल का? याचाही विचार केला पाहिजे. एकूणच बचत करायची असेल, तर खर्चाच्याबाबतीत तुम्हाला सजग राहावेच लागेल.

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमच्यावर एखादे कर्ज असेल, तर खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवणे. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकेल. यामुळे तुम्ही कर्जाच्या ईएमआयमधून लवकर बाहेर पडाल आणि वाचवलेल्या पैशांतून अधिक बचत करू शकाल.

स्वस्तात खरेदी करा

खरेदी हा बचतीचा शत्रू मानला जातो. पण काही गोष्टी अशा असतात की, त्यांची खरेदी करावीच लागते. पण ती करताना तुम्ही त्याबाबत जागृत असाल तर विनाकारण महागड्या वस्तू खरेदी करणे टाळू शकता. यामुळे तुमची मोठी बचत होऊ शकते. ज्या गोष्टी स्वस्तामध्येही उपलब्ध आहेत; त्यासाठी विनाकारण अधिकची रक्कम मोजण्यात कोणताच फायदा नाही. उलट अशाप्रकारे बचत केलेल्या पैशांतून तुम्ही गरजेच्या अधिक वस्तू खरेदी करू शकता. महागाईमुळे त्याची किंमत सुद्धा वाढलेली आहे. पण त्या अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे तो खर्च टाळू शकत नाही.

घरातील किराणा माल किंवा इतर वस्तुंची खरेदी करताना वेगवेगळ्या ब्रॅण्डची किंमत जाणून घ्या. तसेच त्याच वस्तू घाऊक बाजारपेठेत कितीला मिळतात आणि त्याचा दर्जा काय? हे तपासून तुम्ही वस्तुंची निवड करू शकता. किराणा माल स्टोअर्समधून घेण्याऐवजी तो जर तुम्ही घाऊक बाजारातून घेतला तर तुमची नक्कीच बचत होईल.

वेळेचा सदुपयोग करा आणि पैसे मिळवा

महागाईची झळ ही सर्वांनाच बसत असते आणि त्यातून मार्ग हा आपल्याचा काढावा लागतो. महागाईमध्ये पैशांची बचत करणे हा पहिला नियम आहे. पण त्याचबरोबर तुम्ही जर अधिक पैसे कमवू शकत असाल. तर ती पहिल्या नियमापेक्षा मोठी गोष्ट ठरेल. कारण प्रत्येकवेळी खर्चावर नियंत्रण आणणे जमेलच असे नाही. मग अशावेळी अधिक पैसे कसे मिळतील याचा विचार जरूर करावा. 

नियमित कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळेत इतर कामे होऊ शकतात का? अशी कोणती कामे आहेत? जी तुम्ही करू शकता. याचा जर तुम्हाला मेळ घालता आला तर तुम्ही महागाईतही तुम्हाला हवे तसे पैसे खर्च करू शकता. तसेच महागाईच्या काळात योग्य ठिकाणी आणि चांगले रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. ज्या योजनांवर किमान व्याजदर मिळतो, अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे.