राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना सरकारकडून 350 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र ते अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार 15ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकर्यांना कांदा अनुदानाची रक्कम प्राप्त होणार आहे.
प्रत्येकी 200 क्विंटल पर्यंत 350 रुपये अनुदान
राज्यात डिसेंबर ते मार्च महिन्यात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला होता. त्यामुळे शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याला 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार होते.
विरोधकांची आक्रमक भूमिका
सरकारने अनुदान जाहीर केल्यानंतर ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली होती त्या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी सरकारकडे आवेदन सादर केले होते. मात्र, अनुदानास पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही. या संबंधी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत 19 जुलै रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सरकार कांद्याला केवळ 3.5 रुपये प्रति किलो अनुदान देणार आहे. मात्र त्यालाही पणन विभागाकडून उशीर केला जात आहे. अद्याप पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच तयार होत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली होती.
15 ऑगस्टपूर्वी मिळणार अनुदान
पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नाला उत्तर देत असताना कृषी मंत्रालयाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंतचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच प्रति क्विटंल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटल पर्यंतचे अनुदान प्राप्त होणार आहे. सुमारे 700 ते 800 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.