Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SSC-HSC Board Exam: दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपयेच द्यावे लागतील

SSC-HSC Board

SSC-HSC Board Exam : विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर दहावी(SSC) आणि बारावी बोर्ड(HSC Board) परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.

SSC-HSC Board Exam: या वर्षापासून दहावी(SSC) आणि बारावी(HSC) परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्का(Exam Fees) व्यतिरिक्त 50 रुपये अतिरिक्त आकारले जातील असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते मात्र त्यांच्या या निर्णयाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला व  राज्य शिक्षण मंडळाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. या घटनेवर सकारात्मक विचार करुन हे शुल्क कमी करण्यात आले आहेत. यापुढे आता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

सवलतीच्या गुणांसाठी भरावे लागतील फक्त  25 रुपये

राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. या घटनेनंतर वेगवेगळ्या संघटनांकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला व निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन सवलतीच्या गुणांसाठीचा अर्ज करत असताना 50 रुपयांऐवजी आता प्रत्येक विद्यार्थ्याला 25 रुपये छाननी शुल्क भरावे लागणार आहे.  

कोणत्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळतात?

निकालाचा टक्का वाढवण्यासाठी सवलतीचे गुण हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण अतिशय महत्त्वाचे असतात. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या, शास्त्रीय कला आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड यातील विद्यार्थ्यांना हे सवलतीचे गुण देण्यात येतात. या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. या गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येत होते.

50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय कशासाठी?

शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमून त्यांना सर्व प्रस्तावांची छाननी करण्यास सांगतात. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करुन त्रुटींची पूर्तता करून घ्यावी लागते. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करुन 50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.